Gokul Election: "आमदारकी नको मात्र गोकुळचं संचालक करा," अशी एक म्हण कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संदर्भात प्रचलित आहे. गोकुळची वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर असल्याने गोकुळवर नेहमीच राजकारणापलीकडे अभद्र आघाड्या करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र यंदा गोकुळ पहिल्यांदाच पक्षीय राजकारणामध्ये अडकला आहे.

Continues below advertisement

जो गोकुळ मल्टी-स्टेट होऊ नये, गोकुळ दूध संघ हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी मागील पंचवार्षिक निवडणूक एकवटली होती आणि निकालसुद्धा तसाच लागला होता. आता तोच गोकुळ पुन्हा एकदा कोणाच्यातरी घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत का? असा सुद्धा आरोप होत आहे.

गोकुळची स्पर्धा गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अमूलशी सुरू आहे आणि त्यामुळेच की काय गोकुळ बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का? अशीसुद्धा चर्चा दूध उत्पादकांकडून सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता गोकुळची निवडणूक होऊ घातली आहे. गोकुळवर मालकी कोणाची असणार? याचे उत्तर अवघ्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे.

Continues below advertisement

गोकुळची निवडणूक नेमकी होते तरी कशी?

मात्र जागावाटपावरून अजूनही गोकुळमध्ये विशेष करून महायुतीमध्ये त्रांगडं सुटलेलं नाही. त्यामुळे हा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जागावाटप निश्चित केलं असून त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9 जागा मिळाल्या आहेत, त्यामध्ये यड्रावकर गटाचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजपलासुद्धा 9 जागा मिळाल्या आहेत, यामध्ये जनसुराज्य शक्तीचा समावेश आहे. तर शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार 25 जागांवरती महायुतीचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे.

दुसरीकडे राजर्षी शाहू समविचारी आघाडीत सतेज पाटील यांनी एकट्याने शड्डू ठोकला असून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचारही सुरू केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक नेमकी होते तरी कशी? हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. गोकुळची निवडणूक ही इतर निवडणुकांप्रमाणे नसते. त्यामुळे संस्था पात्र होण्यापासून ते ठरावधारकांचा एक प्रतिनिधी इथपर्यंतची ही प्रक्रिया असते. यामध्ये विविध गटांमधून उमेदवार निवडून द्यायचे असतात आणि मतदानाची पद्धतसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंगचीसुद्धा भीती या निवडणुकीमध्ये असते.

शेतकरी थेट मतदान करत नाहीत, संस्थेचा ठराव लागतो

गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादक शेतकरी हे प्रत्यक्ष मतदान करत नाहीत. ते ज्या दूध संस्था किंवा डेअरीला दूध देतात त्या डेअरीचा एक ठराव दिला जातो. म्हणजे त्या दूध डेअरीतील सर्व संचालकांच्या एकमताने एका संचालकाच्या नावे तो ठराव दिला जातो. तो संचालक हा गोकुळसाठी मतदान करतो. 

तसेच प्रत्येक डेअरीला ठराव देण्याचा अधिकार नसतो. ज्या डेअरीमधून नियमित 50 लिटरपेक्षा जास्त दूध संकलन होतं, त्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) नियमित केलं जातं, तसचे त्या डेअरीची निवडणूक नियमानुसार पार पडते अशाच डेअरी गोकुळच्या मतदानासाठी पात्र ठरतात. 

प्रतिनिधी निवड प्रक्रिया कशी असते?

  • गोकुळ दूध संघ पात्र संस्थांची यादी दुग्ध निबंधक प्रशासनाकडे पाठवतो
  • त्यानंतर प्रत्येक पात्र संस्था आपल्या एका प्रतिनिधीचे नाव ठराव करून पाठवते
  • या प्रतिनिधींच्या आधारे 'प्रारूप मतदार यादी' तयार केली जाते
  • थकबाकी किंवा पात्रतेबाबतच्या हरकतींची छाननी झाल्यानंतर पात्र प्रतिनिधींची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाते

संचालक मंडळाच्या जागा व आरक्षण कसं असतं?

गोकुळच्या संचालक मंडळात एकूण 25 निर्वाचित संचालकांच्या जागा असतात

  • सामान्य प्रवर्ग : 20 जागा
  • महिला राखीव: 2 जागा
  • अनुसूचित जाती / जमाती (SC/ST): 1 जागा
  • इतर मागासवर्गीय (OBC): 1 जागा
  • भटक्या व विमुक्त जाती-जमाती (VJNT): 1 जागा
  • याशिवाय तज्ञ संचालक, शासन नियुक्त संचालक आणि कार्यकारी संचालक अशा 3 स्वीकृत जागांचाही यात समावेश असतो

उमेदवारासाठी पात्रता काय? 

उमेदवार हा सक्रिय सभासद आणि संस्थेचा ठरावधारक प्रतिनिधी असणे आवश्यक असतेसंस्थेच्या उपविधीनुसार आवश्यक सेवांचा वापर केलेला असावा व निर्धारित कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेला  उपस्थिती असावी.उमेदवाराच्या संस्थेकडे कोणत्याही प्रकारचे मासिक शुल्क, कर्ज किंवा इतर देणी थकलेली नसलेले प्रमाणपत्र जोडावे लागते.आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना संबंधित जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते

25 मतांचा अधिकार, क्रॉस व्होटिंगची शक्यता

  • अंतिम मतदार यादीतील प्रत्येक ठरावधारक प्रतिनिधीला संचालक मंडळातील 25 उमेदवारांना (विविध प्रवर्गातील पसंतीनुसार) मतदान करण्याचा अधिकार असतो
  • मतदाराला आपल्या पसंतीने उमेदवार निवडण्याची मुभा असल्यामुळे या निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'ची भीती आणि निकालाबाबत अनिश्चितता असते
  • गोकुळचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असून मतदानासाठी एकच मतदान केंद्र असते
  • मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात मतमोजणी पार पडते
मुद्दागोकुळची आकडेवारी
वार्षिक उलाढाल (2025-26)₹4,185 कोटी 
सरासरी दररोज दूध संकलन (2025-26)16.24 लाख लिटर
पीक दूध संकलन20 लाख लिटर/दिवसांपेक्षा जास्त
वार्षिक दूध हाताळणी (डेअरी प्लांट)65.40 कोटी लिटर
दूध उत्पादकसुमारे 4.91 लाख
गावपातळीवरील दूध संस्था8,461
दूध संकलन मार्ग548

कसा आहे गोकुळ निवडणुकीचा कार्यक्रम?

टप्पातारीख / वेळ
उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन) दाखल करणे15 ते 22 सप्टेंबर 2026
नामनिर्देशन पत्रांची छाननी23 सप्टेंबर 2026  
वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे24 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्ज मागे घेणे24 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2026 
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप9 ऑक्टोबर 2026 
मतदानाचा दिवस18 ऑक्टोबर 2026 
मतमोजणी व निकाल19 ऑक्टोबर 2026 

इतर महत्वाच्या बातम्या