Aditya Thackeray On Raj Thackeray: एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती स्वर्गीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही?, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. तसेच माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीय, असंही राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. 


राज ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यावर चर्चा रंगली आहे. याचदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 20 वर्षांआधी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना पक्ष फोडून दुसरा पक्ष बनवला. तेव्हा बाळासाहेबांना किती दु:खं झालं असेल?, तसेच ज्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, असं वाटतं, त्यांना महायुतीमध्ये जागा का मिळाली नाही?, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?


राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात 2024 मधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल, असं भाकीत केलं होतं. तसेच मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं, असं राज ठाकरे म्हणाले. पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.


देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा?; राज ठाकरेंचा सवाल


या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला...एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.


संबंधित बातमी:


Amit Thackeray vs sada sarvankar: शिवतीर्थच्या पायरीपर्यंत जाऊन सदा सरवणकरांना रिकाम्या हाती माघारी का परतावं लागलं? वाचा माहीम विधानसभेची इनसाईड स्टोरी