नवी दिल्ली : आज पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे. पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येऊ शकते, असं बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजात म्हटलं गेलंय. तर आसाम आणि केरळमध्ये काय होणार याबाबत एक्झिट पोलनं काय अंदाज वर्तवले आहेत, ते पाहणं महत्त्वाचं आहे. आसाममध्ये गेल्या दोन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, तर केरळमध्ये डाव्या पक्षांचं सरकार आहे. या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलनं काय अंदाज वर्तवलेत ते पाहूयात.
आसाममध्ये कोणाची सत्ता?
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी 4 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. आसाममध्ये गेल्या दोन टर्म पासून भाजप सत्तेत आहे. आसाममध्ये मतदारसंघ फेररचनेनंतर निवडणूक होत आहेत. तिथं एकूण 126 जागांसाठी मतदान झालं होतं. या साठी 722 उमेदवार रिंगणात होते. एक्सिस माय इंडियानुसार आसाममध्ये भाजप 88 ते 100 जागा जिंकेल. तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळतील. आसाममध्ये भाजपला 48 टक्के मतं मिळू शकतात तर काँग्रेसला 39 टक्के मतं मिळतील, इतरांना 14 टक्के मतं मिळतील असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे.
2021 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आसाममध्ये भाजपला 75 जागांवर विजय मिळाला होता. तर, काँग्रेस आघाडीला 50 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा कमी होत असल्याचं दिसून येत आहे.
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता, डाव्या पक्षांची सत्ता जाणार?
केरळमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सत्तांतर होऊ शकतं. देशात सध्या डाव्या पक्षांची सत्ता एकमेव केरळ राज्यात आहे. एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार इथं काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूडीएफला 78 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 0-3 जागा मिळू शकतात. डाव्या पक्षांच्या एलडीएफला 140 जागांपैकी 49 ते 62 जागा मिळू शकतात.
दरम्यान, केरळमध्ये गेल्या दोन टर्मपासून डाव्या पक्षांचं सरकार सत्तेत होतं. यावेळी त्यांना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी होती. केरळमधील मतदारांचा नेमका कौल काय आहे, याचं उत्तर 4 मे रोजी मिळणार आहे. एक्सिस माय इंडियानुसार केरळमध्ये 50 ते 60 जागा डाव्या पक्षांना मिळू शकतात.
केरळमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी 99 जागा मिळवल्या होत्या. तब्बल 1977 नंतर केरळमध्ये सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत दाखल झालं होतं. तर, 2021 मध्ये यूडीएफला 41 जागा मिळाल्या होत्या.
