सांगली : दिंवगत वसंतदादा पाटील यांचे नातू केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि महाआघाडीला हा मोठा धक्का मानला जातो. प्रतिक पाटील यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर केलेलं नाही.
"मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे, काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे, अशी घोषणा प्रतिक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात केली. काँग्रेसला आज वसंतदादांची गरज वाटत नाही, अशा शब्दात प्रतिक पाटलांनी काँग्रेवर हल्लाबोल केला आहे. वसंतदादांच्या नावाने सामाजित क्षेत्रात काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
सांगलीची जागा शेतकरी संघटनेला देण्यास दादा कुटुंबाचा आक्षेप होता. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेसमध्ये घमासान सुरु होतं. काँग्रेसची परंपरा असलेली सांगलीची जागा द्यायला अनेक जणांचा विरोध आहे. याशिवाय प्रतिक पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं डावललं जात असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आज अखेर प्रतिक पाटलांनी काँग्रेसचा राम राम ठोकून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कोण आहेत प्रतिक पाटील?
- काँग्रेसचे सांगलीचे माजी खासदार
- माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री
- काही काळ केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्रीपदाची जबाबदारी
- माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू
- गांधी घराण्याशी निष्ठावान म्हणून ओळख
- 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव
याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुजय विखे यांना भाजपने अहमदनगरमधून उमेदवारीही जाहीर केली. याशिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजप प्रवेश केला आहे.
साताऱ्यातील फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपचे माढ्यातले उमेदवार असणार आहेत. चंद्रकांत पाटलांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंविरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार आहे.