मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास विविध जागांवर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उमेदवारही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नितीन गडकरी, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपच्या प्रीतम मुंडे आदी नेत्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

Continues below advertisement


प्रकाश आंबेडकरांनी आज सोलापुरातून आपला लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून मोठं शक्तीप्रदर्शनही करण्यात आलं. प्रकाश आंबेकडकरांपुढे सुशीलकुमार शिंदेंचं आव्हान असणार आहे.



नागपुरातून नितीन गडकरींनी भाजपकडून लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फॉर्म भरण्याआधी भाजपकडून रॅलीही काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.


तर सोलापुरातून सुशीलकुमार शिंदेंनीही काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याठिकाणीही काँग्रेसकडून मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. आमदार प्रणिती शिंदेही यावेळी उपस्थित होत्या. तर प्रीतम मुंडे यांनी बीडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.