मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर 550 मतदार तर काहींच्या नावासमोर सुलभ शौचालयाचा पत्ता असलेले मतदार चर्चेत आले होते. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांच्या भाषणात याचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला (Election Commission) टोला लगावला होता. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याच्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं. मतदार यादी तयार करणारी यंत्रणा वेगळी आहे, यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी वेगळी असल्याचं सांगत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी हात झटकल्याचं दिसून आलं.
दुबार मतदार आणि बोगस मतदारांच्या नावांवरुन विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. अनेक ठिकाणी दुबार मतदार आहेत, तसेच अनेक मतदारांच्या नावासमोर पत्ताच नमूद नसल्याची बाब विरोधकांनी निवडणूक आयोगासमोर आणली. तर नवी मुंबईतील आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर 550 मतदारांनी नावे नोंदवली, एकाचा तर पत्ता सुलभ शौचालय असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
Bogus Voters List : मतदार यादी तयार करणारी यंत्रणा वेगळी
सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नावं नोंदवण्यात आली आहेत. त्याला जबाबदार कोण? या प्रश्नावर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं.
निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे म्हणाले की, "मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा ही वेगळी आहे. आम्ही फक्त ती यादी वापरतो. एक तारीख ठरवतो आणि त्या दिवसाची यादी मतदानाला ग्राह्य धरतो. त्याची शहानिशाही आम्हीच करतो. दुबार मतदार असतील किंवा चुकीच्या प्रभागात नाव गेलं असल्यास ते तपासतो. ज्यांची नावे ही आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होती, पण आताच्या यादीत नसतील तर त्या नावांचा समावेश करतो. काही लहान-सहान दोष असतील तर ते दुरुस्त करतो."
ज्या ठिकाणी जागाच नाही, पत्ताच नाही त्या ठिकाणी अनेक मतदारांची नावे आहेत अशांची नावे या यादीत कशी काय घुसडण्यात आली, असा प्रश्नही निवडणूक आयोगाला विचारण्यात आला. त्यावर बोलताना आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे म्हणाले की, "यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी जबाबदारी आहे ती आम्ही घेतो, केंद्रीय निवडणुकीची जी जबाबदारी आहे ती ते पाहतात."
Raj Thackeray On Bogus Voters : बोगस मतदारांवरुन राज ठाकरेंची टीका
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की, "निवडणुकांवेळी घराघरात जाऊन चेहरे ओळखले गेले पाहिजे. नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर 550 लोकांची नोंदणी आहे. एकाचा पत्ता सुलभ शौचालय आहे, काय बसल्या बसल्या सही घेतली काय? काहीही सुरू आहे. हा पोरखेळ नाही, तुमच्या आमच्या आयुष्यातील पाच वर्षे जात आहेत. या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, त्या स्वप्नांची राख रांगोळी मशीन करणार असतील तर काय उपयोग? घराघरात जाऊन बघा, कुठले चेहरे आहेत ते. कायदेशीर गोष्टी करायच्या ते करू. पण, ही खूप मोठी लढाई आहे, यातही महाराष्ट्रचं पुढे पहिलं पाऊल टाकेल."
ही बातमी वाचा: