Continues below advertisement

Election Commission Maharashtra: महापालिका निवडणुकांच्या (Mahapalika Election 2026) पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादीच्या प्रती उमेदवारांना उपलब्ध करून देताना राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) प्रति पृष्ठ दोन रुपये शुल्क आकारण्याचे निर्देश दिल्याने नागपुरात (Nagpur News) नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना मतदार यादीच्या अवलोकनापासून दूर ठेवण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर झालेला मतदार यादीतील घोळ उघडकीस येऊ न देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक महापालिकेतील निवडणूक यंत्रणेला अंतिम मतदार यादीची प्रत देताना प्रति पृष्ठ दोन रुपये दर आकारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नागपुरात प्रत्येक प्रभागातील मतदार यादी किमान अडीच हजार पानांपासून ते साडेपाच हजार पानांपर्यंतची असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला एका प्रभागाची संपूर्ण मतदार यादी घ्यायची झाल्यास किमान 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. यामुळे निवडणूक लढवणाऱ्या अनेक उमेदवारांसमोर आर्थिक अडचण उभी राहत असून, विशेषतः लहान पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांचे प्रचार नियोजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. मतदार यादीच्या आधारे घराघरात पोहोचून प्रचार करण्यासाठी ही यादी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र इतका मोठा खर्च परवडत नसल्याने अनेक उमेदवार मतदार यादी घेण्यापासून दूर राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

Congress: काँग्रेस नेत्याचा निवडणूक आयोगावर आरोप

दरम्यान, काँग्रेस पक्षाने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी आरोप केला की, “मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि घोळ असल्याबाबत अनेक पक्षांनी आधीच गंभीर आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत उमेदवारांनी मतदार यादीची प्रत घेऊ नये आणि त्यामार्फत मतदारांपर्यंत पोहोचू नये, जेणेकरून हा घोळ उघडकीस येणार नाही, असा नियोजनबद्ध प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाकडून केला जात आहे.” हा निर्णय भाजप आणि सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्षपणे मदत करणारा असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना याचा फारसा फटका बसणार नसला, तरी सर्वसामान्य, नवखे आणि विरोधी पक्षांचे उमेदवार या निर्णयामुळे अडचणीत येतील, असा दावा काँग्रेसचा आहे.

Election Commission Maharashtra: मतदार यादीची प्रत मोफत उपलब्ध करून द्यावी

याच पार्श्वभूमीवर, निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना अंतिम मतदार यादीची प्रत मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग या आरोपांवर काय भूमिका घेतो आणि मतदार यादीच्या शुल्काबाबत काही सवलत किंवा बदल होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवणार, मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा, 12 गेमचेंजर घोषणा कोणत्या?