नऊ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विदर्भातील प्रचार दौर्याची सुरुवात अकोल्यातून झाली. या दौऱ्यात वाडेगाव आणि मूर्तिजापूर येथे शरद पवार यांच्या सभा झाल्या. मुर्तिजापूरच्या सभेत पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी कायद्याचं राज्य नसल्याचा आरोप करणारी भाषणं केली. मात्र, याच कायद्याचा बडगा प्लास्टिकबंदीचा नियम तोडल्यावर राष्ट्रवादीवर उगारला गेला.
Sharad Pawar Rally | शरद पवारांच्या सभेत प्लास्टिकचा वापर, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 हजारांचा दंड | अकोला | ABP Majha
या सभेसाठी आलेल्या लोकांसाठी पाच हजारांपेक्षा अधिक प्लास्टिक ग्लासचा वापर करण्यात आला होता. या सभेच्यावेळी उपस्थित असणाऱ्या निवडणुक विभागाने राष्ट्रवादीच्या या नियमभंगाकडे डोळेझाक केली. मात्र, माध्यमांनी हा मुद्दा लावून धरल्यावर तात्काळ कारवाई करीत आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसला दहा हजारांचा दंड ठोठावला. आज दुपारी हा दंडाचा मेमो बजावण्यात आला.
दरम्यान, दुपारी ही दंडाची रक्कम राष्ट्रवादीकडून तात्काळ भरण्यात आली आहे. मुर्तिजापुरच्या पवारांच्या सभेत या प्रकारामूळे स्थानिक आयोजकांच्या बेपर्वाईमूळे राज्यात अकारण पक्षाचं नाव खराब झाल्याची भावना काही वरीष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. आजच्या मुर्तिजापूरातील कारवाईनं जिल्ह्यातील इतर सभांमध्ये आता प्लास्टिकचा वापर थांबतो काय?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.