मुंबई : साधारण 80 दिवसांपासून चाललेली लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election Result) आता संपली आहे. भापजप्रणित एनडीए (NDA) आघाडी आता पुन्हा एकदा देशात सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, एनडीएत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Eknath Shinde Shivsena) तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) वाट्याला नेमकं काय येणार? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाला एक केंद्रीय तर एक राज्यमंत्रिपद तर शिंदेंच्या शिवसेनेला 2 राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या संभाव्य नेत्यांचीही नावे आता समोर आली आहेत. 


मंत्रिपदासाठी कोणाची नावं चर्चेत? 


मिळालेल्या माहितीनुसार केंद्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 राज्यमंत्री तर एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची मंत्रिपदासाठी तर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, हातकणंगलेचे खासदार धैर्यशीस माने यांची नावे राज्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकमेक खासदार सुनिल तटकरे, राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, आदिती तटकरे यांच्या नावांची चर्चा आहे. अर्थात या फक्त चर्चा आहेत. मंत्रिपदाची संधी नेमकी कोणाला मिळणार? याबाबत अधिक स्पष्टता नाही. 


8 जून रोजी मोदींचा शपथविधी


अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच देशभरातील एनडीएतील घटकपक्षांनी भाजपला समर्थनाचे पत्र दिले आहे. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 8 जून रोजी मोदी यांचा शपथविधी होण्यची शक्यता आह. 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.


शपथविधीची तयारी चालू


दरम्यान, दिल्लीमध्ये मोदी यांच्या शपथविधीची तयारी चालू झाली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी इतर देशांतील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार आहे. मोदी यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्रीदेखील 8 जून रोजीच शपथ घेण्याची शक्यता आहे.  


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1 
---------------------
एकूण- 17


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8 
-----------------
एकूण- 30


हेही वाचा :


Ajit Pawar NCP Meeting : अजित पवारांच्या बैठकीला कोण कोण उपस्थित, कुणाकुणाची दांडी?


सुनील टिंगरे, संग्राम जगताप ते अण्णा बनसोडे, धनंजय मुंडे, अजित पवारांकडे किती आमदार, शरद पवारांच्या आमदारांची संख्या किती?


महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला