Eknath Shinde on Rahul Gandhi : "दिल्लीतील एक फुसका फटाका महाराष्ट्रात येऊन गेला", असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारार्थ आज भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, दिल्या अडीच वर्षात समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे, जलयुक्त शिवार योजना अशा अनेक लोकोपयोगी योजना फक्त बंद करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. तर दोन वर्षात सर्व प्रकल्प पुन्हा सुरु करून राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम आम्ही केले. दोन वर्षात तब्बल 124 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. शेतकरी सन्मान योजनेतून 12 हजारांची मदत केली. 1 रुपयात पीक विमा योजना दिली, सततच्या नुकसानीला देखील नुकसानभरपाई महायुती सरकारने दिली शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे सरकार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली. तिला विरोध करण्यासाठी ही काँग्रेसची मंडळी नागपूर कोर्टात गेली आहेत. एकीकडे राज्याकडे पैसे नाही म्हणायचं आणि दुसरीकडे राहुल गांधी स्वतः काल महिलांना तीन हजार रुपये देऊ म्हणाले, मग जर पंधराशे द्यायला पैसे नाहीत तर तीन हजार कुठून देणार असा सवाल यावेळी उपस्थित केला. कर्नाटक आणि छत्तीसगड प्रमाणे निवडणुकीत घोषणा करायच्या आणि नंतर शक्य नाही म्हणायचे असे विरोधकांचे महाराष्ट्रात सुद्धा तेच चालू असल्याचे मतही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत असूनही उठाव केला आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारे सरकार राज्यात आणले. यात राज्यातील 50 आमदार आणि 13 खासदारांनी मला साथ दिली. त्यामुळे शिवसेना वाचवून लोकांच्या मनातील सरकार आम्ही अस्तित्वात आणले. या भागात लाखो हेक्टरवर लिंबूचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे इथे लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी माझ्याकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमचे सरकार पुन्हा आल्यावर इथे नक्की लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करू असे बाळापूरकर नागरिकांना आश्वस्त केले.
अडीच वर्षांत महाविकास आघाडीने चालू असलेले प्रकल्प बंद पडण्याचे काम केले. आताही धारावी पुनर्वसन प्रकल्प रद्द करू, लाडकी बहीण योजना रद्द करू एवढच सांगत आहेत. आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली म्हणून विरोधकांनी 3 हजार देण्याची घोषणा केली. एकीकडे म्हणतात सरकारकडे पैसे नाहीत मग 3 हजार रुपये तुम्ही कसे देणार ते सांगा, असा जाहीर सवाल उपस्थित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या