BMC Election 2026: एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातली फार मोठी हास्यजत्रा असल्याचा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं. आमदारांना सुरतला नेलंत आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं. त्यांच्यासाठी सुरक्षित जाग सुरत हीच असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे. नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल, तर त्या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांचे असूनही नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात, याचा अर्थ व्यवस्था संपली असल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? 

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असे ते म्हणाले. दुसरीकडे, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवाच्या मनात असेल, तर आपला महापौर होईल, असे वक्तव्य केल्याने भूवया उंचावल्या आहेत. 

शिंदे यांचे नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील समीकरणांची कुणकुण लागल्याने भाजपवर दबाव वाढवल्याची चर्चा आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षांसाठी महापौरपद असा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार शिंदे गटातील काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केल्याची माहिती आहे. आमच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही, असे या नगरसेवकांनी सांगितल्याचे समजते. या सर्व घडामोडींची कुणकुण लागल्याने शिंदे यांनी हाॅटेलला नगरसेवकांना पाचारण केल्याची माहिती आहे. दुसरीकडे, आता  त्याच हाॅटेलमध्ये संजय राऊत पोहोचणार आहेत. त्यामुळे शिंदे यांची एकाचवेळी कोंडी झाल्याची चिन्हे आहेत, तर भाजपवर दबाव वाढवून सत्तेचा वाटा मिळवण्याची संधीही निर्माण झाल्याचे बोलले जात आहेत.  

Continues below advertisement

बहुमत हे चंचल असतं

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं. बहुमत पाऱ्यासारखं असतं, ते कधीही सरकू शकतं. हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे. जर एवढं सोपं असतं, तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले. यावर आमच्या 'देवाभाऊंचं' काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा, अशी मागणी त्यांनी  केली. फडणवीस डावोसला आहेत. ते अनेक वर्ष तिथे जातात, पण गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत नाही, त्यांची सगळी गुंतवणूक निवडणुकीमध्ये असते, असा टोला त्यांनी लगावला. 

फडणवीस यांना मान्य होईल का? 

ते म्हणाले की, अमित शहांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा? हे देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का? फडणवीस वेताळाप्रमाणे हट्टी आहेत, एवढं मी त्यांना ओळखतो. ही शिवसेना नसून अमित शहाची सेना आहे. अमित शाहांना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे आणि फडणवीस त्याला मान्यता देणार नाहीत. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांनी मुंबई भाजपच्या घशात घातली, याबद्दल बाळासाहेब ठाकरे त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या