मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळालं. या यशानंतर महायुतीत सध्या सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केला जातोय. मात्र मुख्यमंत्रि‍पदावरून महायुतीमध्ये सध्या धुसफूस चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदावर अडून बसले आहेत. तर दुसरीकडे सर्वांत मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजपादेखील मुख्यमंत्रि‍पदावर ठाम आहे. याच कारणामुळे या दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांत नाराजी दिसून येत आहे. 


कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टाळलं?


मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली करण्याच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान, या दोन्ही नेत्यांत काहीसा दुरावा असल्याचं दिसलं. या कार्यक्रमातील दृश्य पाहून हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत असल्याचं बोललं जातंय. त्यांची देहबोली पाहून असा दावा केला जातोय. मुख्यमंत्रिपद हे यामागचं मुख्य कारण आहे का? असं हे दृश्य पाहून विचारलं जातंय.


एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी दबाव? 


महायुतीत भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र लढले. विधानसभा निवडणुकीला ते एकदीलाने सामोरे गेले. त्याचा परिणाम म्हणून महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळालं. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे तिन्ही नेते एकत्र आले होते. त्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी या नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत होतं. मात्र गेल्या दोन दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी दबाव टाकला जात असल्याचं बोललं जातंय. शिंदे यांच्या आमदारांकडूनही हीच भावना व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपा मात्र हा दबाव झुगारून फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, अशा भूमिकेत आहे. सध्या या दोन्ही पक्षांत मुख्यमंत्रि‍पदावरून चर्चा चालू आहे. मात्र आज सकाळच्या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मकता दिसली नाही. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना उत्स्फूर्तपणे अभिवादन केलेले नाही. त्यामुळे आता मु्ख्यमंत्रिपदावरून या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा केला जातोय.  


सामोपचारानं मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न


दरम्यान, सामोपचारानं दोनही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून यातून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न आहे. वाटाघाटी करून महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग काढला जाईल, असं भाजपाच्या गोटातून सांगण्यात येतंय. वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच भाजपाकडून निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री अमित शहा आज म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत येणार होते. मात्रराजधानी दिल्ली इथं पाच वाजता शासकीय कार्यक्रम असल्यानं अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातंय.


Video :



हेही वाचा :


Mahayuti CM: राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?