Dilip Walse Patil, आंबेगाव : "काही लोक म्हणतात अटक होणार होती, काही म्हणतात ईडी आणि सीबीआयची नोटीस आली होती. म्हणून त्यांनी शरद पवारांना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले. मात्र मी यापूर्वी सांगितलेलं आहे. मला ईडी, सीबीआय अथवा अन्य कोणत्या एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणी त्या संदर्भातील पुरावा आज रात्री नऊ वाजेपर्यंत आणून द्यावा, मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घेतो", असं चॅलेंज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. ते आंबेगाव येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिलीप वळसे पाटील काय काय म्हणाले?
मी नार्को टेस्टला तयार आहे., त्यांची नार्को टेस्ट केली तर देवदत्त निकमांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. विरोधक म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, बिनधास्त करा. पण माझी ही करा अन देवदत्त निकमांची ही नार्को टेस्ट करा. माझ्या नार्को टेस्टमध्ये काय बाहेर पडेल याची मला कल्पना आहे, पण तुम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
देवदत्त निकम यांना दिलीप वळसेंविरोधात उमेदवारी
शरद पवारांची साथ सोडल्यानंतर दिलीप वळसे पाटील पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. अजित पवार यांनी त्यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात देवदत्त निकम यांना मैदानात उतरवलं आहे. याशिवाय शरद पवारांनी दिलीप वळसेंविरोधात सभा घेत, त्यांना पाडण्याचे देखील आवाहन केले आहे. दरम्यान, दिलीप वळसे आणि देवदत्त निकम यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.
दिलीप वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले, आता विरोधक म्हणाले महिला असुरक्षित आहेत, मग करू न आपण सगळी चौकशी. बदलापूर पासून ते नागापूर (देवदत्त निकमांचे गाव) पर्यंत सगळी चौकशी करूयात. अहो यांना गावातील एक पतसंस्था चालवता आली नाही अन हे विधानसभा अन् राज्य चालवायची भाषा करतायेत. विधानसभा अध्यक्ष असताना मी आमदारांना थांबवायचो पण आज मला लोक थांबवत आहेत. पण काही हरकत नाही, शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या पाण्यासाठी लढा देत राहिन.
इतर महत्त्वाच्या बातम्या