सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांचा जोरदार सभा आणि प्रचार दौरे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिल्लीतील बडे नेतेही महाराष्ट्रात सभा गाजवत आहेत. तर, महायुती व महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात सभा घेतल्यानंतर बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना दिलीप सोपल यांनी बॅग तपासणीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील मोदी सरकार व महायुतीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते, असे म्हणत बॅगा तपासणीच्या पक्षापातावरुन थेट उद्धव ठाकरेंसमोरच सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासण्यात आल्याचे व्हिडिओ माध्यमातून समोर आले आहे. त्यावरुन, शिवसेना युबीटीचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दिलीप सोपल यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला स्थानिक मुद्द्यांना हात घातला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी जरं निवडूनन आलो तर बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण करेन, वैराग तालुक्याची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून युती काळात मंजूर केलेलं होतं पण तांत्रिक अडचणीमुळे थांबलं. पण, पुन्हा तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून उद्धव ठाकरे साहेबांसोबत दर्शनाला येईन, पाणी पूरवठा, जुनी पेन्शन योजनासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन सोपल यांनी तालुक्यातील जनतेला दिले. तसेच, तालुक्यात सुरु असलेला भ्रष्टाचार आणि दडपशाहीतील तालुका भयमुक्त करण्याचा प्रयत्न करेन असे म्हणत विरोधकांवर टीका केली. तर, उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यावरुन सध्या राज्यात चर्चा होत असताना दिलीप सोपल यांनीही भाषणातून तोच मुद्दा उपस्थित केला.
उद्धव साहेब, तुमच्या बॅग तपासण्यापेक्षा पुलवामामध्ये ज्या गाडीतून स्फोटकं गेली ते तपासले असते तर चाळीस जवान शहीद झाले नसते, असा टोला केंद्रातील मोदी सरकारला लगावला. तसेच, मशाल घेऊन पेटलेली जनता महायुतीचे अन्याय सरकार उलथून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही सोपल यांनी म्हटले.
औसा मतदारसंघा उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी
शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सभा घेत आहेत. त्याअनुषंगाने आज औसा मतदारसंघात ते सभेसाठी आले असता निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅग तपासण्यात आली आहे. यावेळी, उद्धव ठाकेरंनी माझ्यासारखंच मोदींचीही आज बॅग तपासा, मोदींची आज सोलापुरात सभा होत असून, त्यांची बॅग तपासा असे म्हटले होते. उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची औसा मतदारसंघातील सभा झाल्यानंतरही त्यांना सुरक्षा यंत्रणांच्या नियमांचा सामना करावा लागला. कारण, मोदींच्या सभेचं कारण देत उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण काही काळासाठी रोखण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांना औसा येथील हेलिपॅडवरुन हवाई उड्डाणं करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी नाराजी व संताप व्यक्त केला आहे.