सोलापूर : सोलापुरातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची महाआघाडी झाली आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आल्यानं राज्यभर याची चर्चा झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही शिवसेना एकत्रित हे मी घडवून आणलं नाही ते घडून आलेलं आहे, असं सोपल यांनी म्हटलं.
घडवून आणलं नाही, घडून आलं, मी कोण घडवणार? : दिलीप सोपल
बार्शी येथील दोन्ही शिवसेना एकत्रित प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही शिवसेना एकत्रित मी घडवून आणलं नाही. हे घडवून आलेलं आहे. मी कोण घडवणार, घडवलेले सगळे उपस्थित आहेत. 'जो जे वांछील, तो ते लाहो' असं दिलीप सोपल यांनी म्हटलं.
'काहीजण म्हणले, मला मशालीवर लढायचं ओके. काहीजण म्हणले, घड्याळ पाहिजे. घड्याळ घेऊन टाका. घड्याळाबद्दल प्रेम असणारे कार्यकर्ते त्यांनी घड्याळ मागितलं. काहीजण म्हणले, बाणाने आणि काय केलं. बाण आम्हाला पाहिजेल. त्यांना म्हणलं, बाण घेऊन उभा रहा', असं दिलीप सोपल यांनी म्हटलं. तुतारी आणि घड्याळ एकच आहे. वर झालं तर आपल्या इथे का नको. वेगळी तुतारी नको, घड्याळ आहे, असं हे सगळं जमून आलेलं आहे. ओढून ताणून काही आलेलं नाही असं दिलीप सोपल यांनी स्पष्ट केलं. बरीच चर्चा झाली त्या प्रमाणं हा मेळा जमून आला आहे. ही सगळी चांगली चांगली फुलं. चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम मी सुई म्हणून केलं, असं दिलीप सोपल यांनी म्हटलं. हे केल्याशिवाय बार्शी तालुक्याला आता पर्याय नव्हता, असं म्हणत आमदार दिलीप सोपल यांनी दोन्ही शिवसेना सोबत लढण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
बार्शीत भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र
सोलापुरातील बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानं राज्यभर चर्चा झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केलं होतं. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.
