कोल्हापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वादाला आमंत्रण देणारी टिप्पणी करणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत (CM Ladki Bahin Yojana) आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची फिर्याद निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून नोंदवण्यात आली आहे. 


धनंजय महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या सभेत त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा मागवला होता. मात्र, हा खुलासा अमान्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता धनंजय महाडिक यांच्यावर निवडणुकीची आचारसंहिता मोडल्याची फिर्याद दाखल करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यापुढे निवडणूक आयोग धनंजय महाडिक यांच्यावर कठोर कारवाई करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


मुन्ना महाडिकांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यातील महिला ही गोष्ट लक्षात ठेवतील. निवडणुकीवेळी मविआला मतदान करुन लाडक्या बहिणी याचा वचपा काढतील, असे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले होते. 


धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले होते?


काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो.  कोण लय बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे आम्ही पैसे लगेच बंद करतो. राजकारण करत आहात या पैशांचं? काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. आमच्याकडे फोटो द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. लय मोठ्याने कोण भाषण करु लागली, किंवा दारात आली तर लगेच फॉर्म देऊन सही घ्यायची आणि पैसे बंद करुन टाकायचे. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत. आम्ही दुसऱ्या गरीब महिलेला देऊ आम्ही, पण असा दुगलेपणा येथून पुढे चालणार नाही, असे धनंजय महाडिक यांनी म्हटले.



आणखी वाचा


लाडकी बहीणचे 1500 रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो : धनंजय महाडिक


लाडक्या बहि‍णींवरील धनंजय महाडिक यांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे परखड मत, म्हणाले..