पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. येथील प्रकल्प गुजरातला चालले आहेत. महाराष्ट्र क्रमांक एकवर असताना या सरकारच्या काळात तो सहाव्या क्रमांकावर गेल असून राज्य मागे जात आहे, अशी टीका केली. यानंतर पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांवर कडक शब्दांत टीका करत त्यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक” असे संबोधले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरित होत असल्याची खोटी माहिती पसरवून विरोधक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अजूनही पहिली पसंती आहे आणि संपूर्ण भारतातील ५२ टक्के विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक दृष्टिकोनातून मजबूत आहे आणि विरोधकांनी पसरवलेली माहिती फसवी आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्या सरकारने महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी एक आदर्श ठिकाण बनवले आहे.” त्यांच्या मते, राज्यातील औद्योगिक स्थान बदलत असल्याची बातमी खोटी असून ती फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे.
सुप्रिया सुळे फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीच्या व्यवस्थापिका
फडणवीसांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. त्यांनी सुळे यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी” ची व्यवस्थापिका संबोधले आणि त्यांनी हिंजवडीमधील IT कंपन्या बाहेर गेल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. फडणवीसांनी म्हटले की, राज्यातील औद्योगिक आणि IT क्षेत्र सशक्त आहे आणि कोणतेही आव्हान हे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आलेल्या अडचणींचा परिणाम आहे. सुळे यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी याला महाराष्ट्राच्या प्रगतीस नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न म्हटले.
फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरील टीकेचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, ठाकरे यांची योजना विरोध दर्शवणे हे सर्वसामान्य लोकांच्या गरजांशी विसंगत आहे. फडणवीसांनी स्पष्ट केले की, या योजनेतून हजारो मुलींना आर्थिक मदत मिळणार असून त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. सभेच्या शेवटी फडणवीसांनी भाजप सरकारच्या रोजगार निर्मितीविषयी आश्वासन दिले. त्यांनी 10 लाख युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आणि महाराष्ट्राच्या आर्थिक स्थैर्याचे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्याचे वचन दिले.
आणखी वाचा