Maharashtra Goverment: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत मुख्यमंत्रिपदाबाबत निश्चिती झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या नावांवर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे आज सकाळपासून सागर बंगल्यावर आमदारांची रिघ पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आतापर्यंत नवनीत राणा, रवी राणा, धनंजय मुंडे, भरत गोगावले, जयकुमार रावल, सुधीर मुनगंटीवार, आशिष देशमुख हे आमदार दाखल झाले आहेत. दरम्यान काल दिवसभरात देखील महायुतीमधील अनेक आमदार सागर बंगल्यावर दाखल झाले होते. अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी मिळणार-
नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होत तरुण चेहऱ्यांना देखील मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इतर मंत्र्यांचीही नावे निश्चित होणार आहे, असं विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
सागर बंगल्याबाहेर बॅनरबाजी-
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर 'सदैव मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. नाशिकच्या कैलास ढाकणे यांच्यकडून करण्यात आली आहे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूण राहिले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे-
विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
आज दिल्लीत फडणवीस, शिंदे, पवारांची अमित शाह यांच्यासोबत बैठक-
सत्तास्थापनेत शिवसेनेकडून कोणतीही आडकाठी नसेल असा निरोप एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून कळवला आहे. आज दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.