छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना आता फडणवीसांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विनोद पाटलांची भेटल घेतली. ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याच देवेंद्र फडणवीस म्हणाले. ऐन निवडणुकीच्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विनोद पाटलांची भेट घेतल्याने मराठवाड्यात भाजपचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनोद पाटील हे आमचे मित्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विषय होता त्यावेळी विनोद पाटलांची विशेष मदत झाली. मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं, कसं टिकवायचं याबाबत त्यांची मदत झाली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालाय याचिका असताना विनोद पाटलांनी मदत केली. त्यामुळे संभाजीनगरमध्ये असताना त्यांची भेट घ्यायला आलो. ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे. 


मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न


मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर भाजपचे सर्व उमेदवार पाडू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "त्यांनी भूमिका मांडल्यावर आमची भूमिका मांडू. आम्ही आपलं काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षण दिलं आणि टिकवलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना रोजगार दिले. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी मदत केली."


आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. संधी मिळाली त्यावेळी मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला. त्यामुळे कुणी किती टीका केली, वाद केला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या समोर जे लोक आहे त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही. 40 वर्षे जे सत्तेत होते, त्यांनी कधीही मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला नाही, कधीही प्रयत्न केला नाही. उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं ते म्हणाले."


विनोद पाटलांना संधी मिळणार का?


मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण त्यावेळी महायुतीकडून त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात एक निवडणूक कुणाचं भविष्य ठरवत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात. विनोद पाटील यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. त्यांनी सातत्याने राजकीय पेक्षा सामाजिक भूमिका स्वीकारली. जर पूर्णपणे राजकीय भूमिका स्वीकारली त्यावेळी चित्र वेगळं असेल. 


ही बातमी वाचा: