मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या दिवशी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बाहेर बसले असल्याची माहिती आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरु आहे. यावेळी इतर आमदार देखील बाहेर बसले असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतचा निर्णय स्पष्टपणे सांगितला नव्हता. दुपारच्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देखील एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला नव्हता. भाजपनं त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागेल.
शपथविधी सोहळ्याबाबत एकनाथ शिंदेंचे आदेश
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्या साठी तयारी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या शहरातून आझाद मैदानात येण्यासाठी गाड्या आणि बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना आझाद मैदानात बोलवण्यात आले. उद्या नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यात नवीन सरकारचा मुख्यमंत्री तसेच उप मुख्यमंत्री आणि इतर मंत्री शपथ घेणार आहेत.
दुपारच्या पत्रकार परिषदेत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना काल भेटलो, त्यांनी सरकारमध्ये असावं अशी विनंती केल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे देखील सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी संध्याकाळपर्यंत थांबण्यास सांगितलं.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सारखं संवेदनशील नेतृत्त्व राज्याला हवं आहे. एकनाथ शिंदेंनी राज्याच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं, अशी इच्छा असं प्रविण दरेकर म्हणाले.
इतर बातम्या :