नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारे, अनेकांना IAS, IPS बनवणारे अवध ओझा यांना राजकारणाच्या पटलावर मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. अवध ओझा हे आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पटपडगंज मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. पण त्यांना भाजपच्या रवींद्र नेगी यांच्याकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 


अवध ओझा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून नवी दिल्लीमध्ये ते यूपीएससीचा क्लास घेतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. त्यामध्ये 'राजा बनण्यासाठी काय गरजेचं आहे' या संदर्भातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुसऱ्यांना राजा बनवणारे अवध ओझा मात्र स्वतः राजकारणात राजा होऊ शकले नाहीत. 


पटपडगंज मतदारसंघातून भाजपचे रवींद्र सिंह नेगी 28072 मतांनी विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण तेरा फेऱ्यांनंतर रवींद्र सिंह नेगी यांना 74,060 मते मिळाली, तर अवध ओझा यांना 45,998 मते मिळाली. 


राजकारणात यशस्वी नाहीत


अवध ओझा यांनी 2 डिसेंबर 2024 रोजी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पक्षात प्रवेश केल्यापासून ते दिल्ली विधानसभा निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती. या निवडणुकीत 'आप'ने त्यांना पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. या ठिकाणाहून मनिष सिसोदीय निवडणूक लढायचे. ते यावेळी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या दोघांनाही आता पराभवाचा धक्का बसला आहे. 


मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी


अवध ओझा हे मूळचे उत्तरप्रदेशातील गोंडा परिसरातील आहेत. अवध ओझा यांचे पूर्ण नाव अवध प्रताप ओझा आहे, परंतु UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये त्यांना ओझा सर म्हणून ओळखले जाते. अवझ ओझा हे गेल्या 22 वर्षांपासून यूपीएससी आणि इतर नागरी सेवा परीक्षांसाठी क्लास घेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.


ही बातमी वाचा: