सिंधुदुर्ग : भाजपकडून खासदारकी मिळवायची आणि भाजपविरोधातच काम करायचे, यापेक्षा आपल्या पक्षाच्या नावाप्रमाणे नारायण राणेंनी 'स्वाभिमान' दाखवत खासदारकीचा राजीनामा देत मैदानात उतरावे, असं आव्हान  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मुलाचा राजीनामाही नारायण राणेंनी द्यावा, असा टोला केसरकरांनी लगावला आहे. एवढे दिवस गप्प होतो, ते तुम्हाला घाबरुन नव्हे, तर जनतेची कामं करत विकास निधी आणत होतो, म्हणून. आता मैदानात उतरत तुमचं खरं स्वरुप जनतेसमोर आणणार, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला.

शिवसेना-भाजप, रिपाइं (आठवले गट), रासप युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील हिवाळे जिप मतदारसंघातील श्रावणमध्ये आयोजित प्रचारसभेत दीपक केसरकर यांनी खासदार नारायण राणेंना लक्ष केलं.

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांच्या नाकी नऊ येण्याची चिन्हं आहेत.