कोल्हापूर: धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या (Congress) सभांना जाणाऱ्या महिलांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य केले. आता ही चूक समोर आल्यानंतर ते ती मान्य करण्याऐवजी त्याचे समर्थन करत आहेत. यामधून भाजपने लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) फक्त निवडणुकीसाठी आणल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील महिला ही गोष्ट विसरणार नाहीत, त्या निवडणुकीत याचे उत्तर बरोबर देतील, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले. ते शनिवारी 'एबीपी माझा'शी बोलत होते.
यावेळी सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मला वाटतं, चोराच्या मनात चांदणं बोलतात, तसला हा प्रकार आहे. स्वत: चुकीचं वक्तव्य करायचं आणि देशातील लोकांनी चूक दाखवली की, म्हणायचं ही चूक नाही. ही मोठी धाडसाची कृती म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील भगिनी ही गोष्ट विसरणार नाहीत. भाजपच्या खासदारांनी केलेलं हे वक्तव्य तुम्हाला मान्य आहे का, हे मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारायचे आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. भाजपचे नेते बेताल वक्तव्यं करुन महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत चालले आहेत. धनंजय महाडिक भरसभेत भाषणात बहिणींना धमकी देतात, तुमची व्यवस्था करतो बोलतात. व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? हा आणि कोल्हापूरमधील महिलांना धमकी देण्याचा प्रयत्न आहे, याकडे सतेज पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल: सतेज पाटील
धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर ते म्हणतात की, काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना सामावून घेण्याच्यादृष्टीने मी ते वक्तव्य केले होते, असा दावा महाडिक करतात. पण वंचित महिलांना लाडक्या बहीण योजनेत सामावून घ्यायचे होते तर त्यांचा नाव आणि फोटो घ्या, असे बोलायची काय गरज होती. सरकारने एक जाहिरात देऊन योजनेपासून वंचित असलेल्या महिलांना अर्ज करायला सांगितले पाहिजे होते. पण खोटं बोल रेटून बोल ही महाडिकांचा स्टाईल आहे. त्यांना आपल्या वक्तव्याचा पश्चाताप नाही, ते उलट आपल्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यांच्या व्यवस्था करतो, या शब्दाचा अर्थ काय? धनंजय महाडिकांचं शिक्षण झालं नाही की त्यांना मराठी भाषा कळत नाही. भाजपने सांगितलंय की त्यांनी स्वार्थासाठी हे नाटकं केलंय, निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. राज्यातील महिला महाविकास आघाडीला मतदान करुन याचं उत्तर देतील, असे सतेज पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा