पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गायब झालेले शंकर जगताप (Shankar Jagtap) आता समोर आले आहेत. मी वैयक्तिक कामानिमित्ताने लोणावळ्याला गेलो होतो, अश्विनी जगताप यांच्या प्रचारात सक्रिय भूमिका घेणार असं शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर शंकर जगताप हे नाराज असल्याची चर्चा होती.
काय म्हणाले शंकर जगताप?
तब्बल आठ तास गायब असलेले शंकर जगताप यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी लोणावळ्याला गेलो होतो. त्यानंतर नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थिती लावली. पक्षाने जो काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे. दोन अर्ज घेतले होते ते पक्षाच्या आदेशावरुनच. दोघांचेही अर्ज भरा असं पक्षाने सांगितलं होतं. यापुढे प्रचारात सक्रिय असणार आहे. कुणालाही तिकीट मिळालं असतं तरी पक्षासोबत राहिलो असतो.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली असून त्यासाठी भाजपकडून अश्विनी जगताप आणि शंकर जगताप हे दोघेही उत्सुक होते. पण पक्षाने आता अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शंकर माझ्या मुलासारखा, अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया
चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारीवरून आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही, माझा दीर शंकर हा मला मुलासारखा आहे, असं त्या म्हणाल्या.
अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेऊन भाजपच्या जागेवर दावा केला होता. त्यानंतर जगताप कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाले आहेत, अशा चर्चा निर्माण झाली होती. त्यावर अश्विनी जगताप यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, आमचं खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी जगताप कुटुंबीयात अंतर्गत वाद असल्याच्या अफवा उठवल्या होत्या. मी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे.
अश्विनी जगताप कोण आहेत?
अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय असायच्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत.