पुणे: राज्यात काल(बुधवारी) झालेल्या विधानसभा मतदानाचा निकाल दोन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला लागणार आहे. तत्पूर्वी अतिउत्साही समर्थकांकडून आपल्या नेत्याला आमदारकीच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली आहे. चिंचवड विधानसभेतील (Chinchwad Assembly constituency) महायुतीतील भाजपचे उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) समर्थकांकडून ही असाच आततायीपणा दाखवायला सुरुवात झाली आहे. निकालापूर्वी असा एक फ्लेक्स झळकवला की मोठी प्रसिद्धी मिळते, याची कल्पना अशा समर्थकांना असते. याच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी फ्लेक्सबाजी करण्याचं फॅड सुरु आहे, याची प्रचिती शंकर जगताप (Shankar Jagtap) समर्थकांकडून दिसून येत आहे.
मात्र, अशात आपल्या नेत्याचा पराभव झाला तर त्या समर्थंकांसह नेत्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातं. आता शंकर जगतापांबाबत नेमकं काय घडतं? ते खरंच आमदार होतात की ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात? हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. चिंचवड मतदारसंघात निकालापूर्वी शंकर जगतापांना आमदारकीच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकले असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात झळकले बॅनर
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरासमोर अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर्स झळकल्याने चर्चा सुरू आहेत. निकालापूर्वीच शहरातील अनेक मतदारसंघांमध्ये विजयाचा जल्लोषाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या माधुरी मिसाळ आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्यात लढत झाली आहे. पुण्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघात महिला उमेदवार आहेत. याच मतदारसंघात अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून विजयापूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली आहे.
कसब्याचा आमदार मीच होणार; हेमंत रासने यांना विश्वास
निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मतदान झाल्यानंतर आज पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हे श्रमपरिहार करताना दिसत आहेत, हेमंत रासने यांनी मंडईतील मिसळ हाऊसमध्ये जाऊन मिसळीवर ताव देखील मारला आहे. रोजच्या मित्रमंडळींसोबत मिसळीचा आस्वाद घेताना ते दिसत आहेत. गेली पंधरा दिवस निवडणुकीची जी काही धामधूम होती, ताणतणाव होता त्यातूनं बाहेर पडून आज रिलॅक्स दिवस घालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कसब्याचा आमदार मीच होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक
खडकवासला मतदारसंघाचे मविआचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत मोठी मिरवणूक काढली. दोडकेंची मिरवणूक सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.