Chhatrapati Sambhajinagar mahapalika election result 2026: मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका असणाऱ्या छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. महापालिकेच्या 115 जागांसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. संभाजीनगरच्या महापालिकेवर कोणाचा भगवा फडकणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. भाजप 97 जागांवर निवडणूक लढवत असून शिंदे सेना 92 जागी निवडणूक लढवत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 97 जागा तर काँग्रेस 77 अजित पवारांचे राष्ट्रवादी 77 आणि एमआयएम 48 जागांवर निवडणूक लढवत आहे. 

छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी घराणेशाहीला झुकतं माप दिलंय . नेत्यांची मुलं, भाऊ ,पीए, जातीच्या उमेदवारांना उमेदवारीचे तिकीट दिल्याने शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा रंगली होती. पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा आणि मुलगी तसेच चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या, अंबादास दानवे यांचे सख्खे भाऊ, मंत्री अतुल सावे यांचे पीए, खासदार भागवत कराड यांचे निकटवर्तीय मैदानात असल्याने संभाजीनगर महापालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. 

गुलमंडी प्रभागातून खैरेंचा पुतण्या मैदानात

छत्रपती संभाजीनगर शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी प्रभागात ( 15 अ) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या माजी नगरसेवक सचिन खैरे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपचा बंटी चावरीया यांच्याशी त्यांची लढत आहे.

याच प्रभागातील 'ड ' मधून शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जयस्वाल यांची लढत भाजपचे मिथुन व्यास, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे लक्ष्मीनारायण बाखरिया यांच्याशी होणार आहे.

संजय शिरसाट यांची कन्या मैदानात

छत्रपती संभाजी नगरच्या प्रभाग 18 अ मधून संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांची कन्या हर्षदा शिरसाठ महापालिकेच्या मैदानात आहेत. हर्षदा शिरसाट यांची लढत भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होत आहे. हर्षदा शिरसाठ यांची राजकारणात एन्ट्री असल्याने संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुसरीकडे संभाजीनगरच्या प्रभाग 29 अ मधून पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांना दुसऱ्यांदा महापालिकेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत भाजपचे भगवान गायकवाड तसेच ठाकरे गटाचे किशोर साबळे आणि एमआयएमच्या मोनिका मोरे यांच्या सोबत होत आहे .

अंबादास दानवे यांचे बंधूही महापालिकेच्या रिंगणात

छत्रपती संभाजी नगरच्या प्रभाग 16 ड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत शिवसेनेचे मनोज बल्लाळ यांच्याशी आहे.

रशीद मामुंची एकच चर्चा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गरम पाणी वॉर्डातून नगरसेवक आणि आरक्षणामुळे महापौरपदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर एकच चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रशीद मामूंना पक्षात प्रवेश दिल्यापासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तोंडी त्यांचे नाव आहे. संभाजीनगरचा प्रभाग क्रमांक 4 ब मधून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत MIM चे खान अमीर अनवर यांच्याशी आहे. रशीद मामूंच्या उमेदवारीला खैरे विरोध केला होता. प्रचारासाठी जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये रशीद मामू आघाडीवर आहेत.

माजी महापौर घोडले दाम्पत्याची प्रतिष्ठा पणाला

शिवसेनेत पडलेल्या फुटी नंतर जन्म व माजी महापौरांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता यात नंदकुमार घोडले अनिता घोडले या दांपत्याचाही समावेश होता. शिंदे सेनेने अनिता घोडले यांना प्रभाग 29 ब मधून उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कोमल तरंगे भाजपच्या वंदना देवकाते यांच्यासोबत होणार आहे.