नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) 237 जागांवर विजय मिळवत मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. भाजपने (BJP) या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असे बोलले जात आहे. त्यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी युती असते, ,त्यावेळी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. समजूत काढावी लागते, त्यामुळे महिना-महिना वेळ लागतो, त्यामुळे हा वेळ काहीच नाही. पुढील दोन-चार दिवसांत शपथविधीचे कार्यक्रम पार पडतील. आज दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरविला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणे हे स्वाभाविक आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीस होतील असे म्हटले जात होते. पण, शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी फडणवीस यांनी मी बाहेर राहतो असे म्हटले होते. पण पक्षाचा आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. एक प्रकारे ती सुद्धा अवहेलना असते. पण त्यांनी ती सहन केली आणि 100 टक्के कामाला झोकून दिले, रात्रंदिवस काम करत महायुतीला जिंकून दिल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले.
भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या हक्कावर गदा येऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काम केले, शक्ती उभी केली, त्यामुळेच काही लोक फडणवीसांना टार्गेट करत आहेत, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. निरर्थक भाषा सुरू आहे. ओबीसी हक्कावर गदा येऊ नये, म्हणून फडणवीस काम करतात, असेही त्यांनी म्हटले.
...तर माझे मताधिक्य वाढले असते, कमी कसे झाले?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीनवर आरोप केले जात आहेत. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला 56, 57 हजाराचे लीड होते. माझे मतदान 1 लाखावर जायला हवे होते. जरांगेंमुळे एका मोठ्या वर्गाचे मतदान मिळाले नाही. ईव्हीएममध्ये गडबड असती तर माझे मताधिक्य वाढले असते ते कमी का झाले? लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते, काहीतरी कारणे शोधावी लागतात, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडावे लागते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.
आणखी वाचा