Haryana Elections Results 2024: निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी, एससी, एसटी  ओबीसी, मागासवर्गीय इत्यादी समाज काँग्रेसच्या (Congress) खोट्या प्रचाराला बळी पडला. काँग्रेसने प्रचारादरम्यान सांगितलं होतं की आमचा खासदार निवडून द्या, आम्ही महिलांना प्रति महिना आठ हजार रुपये खटाखट देऊ. मात्र, त्यानंतर काँग्रेस उघडी पडली आणि काँग्रेसचा खोटारडेपणा देशात उघड झाला. तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार हे येत्या 2029 पर्यंत आहे. त्यामुळे देशातील त्या त्या राज्याला देखील डबल इंजिन सरकारची गरज आहे.


त्यामुळेच हरियाणा, जम्मू काश्मीरसह देशातील जनतेला हे कळून चुकले आहे की, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पर्याय आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील जनतेला वाटतं की आपल्या राज्यातही मोदींचे सरकार यावे. त्यामुळे जनता विकसित भारतासह विकसित राज्यासाठी त्यांना साथ देत आहे. हेच या जनमतातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी बोलताना व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीरसह हरियाणातील भाजपच्या विजयी घोडदौड बाबत ते बोलत होते. 


काँग्रेसचा खोटारडेपणा देशात उघड झाला-चंद्रशेखर बावनकुळे 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जर का आपण राहिलो, तरच राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच जम्मू काश्मीर आणि हरियाणातील नागरिकांनी भाजपला साथ देत मोठा विजय मिळवून दिला आहे. राज्याचा जर का विचार करायचा झाला, तर 14 कोटी जनतेच्या विकासाचं आणि राज्याला विकासाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर पोचवण्याचे स्वप्न असेल तर, राज्यात देखील डबल इंजिन सरकारच ते स्वप्न पूर्ण करू शकणार आहे. म्हणून प्रत्येक राज्यातील जनतेला असं वाटतं की, आपण  मोदीजीं सोबतच राहायला पाहिजे. नुकतेच पंतप्रधानांनी देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आपल्या शंभर दिवसांचा अजेंडा देशापुढे मांडला, म्हणूनच भारतातील  जनता आता मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली आहे. महाराष्ट्रात देखील असेच काहीसे चित्र दिसेल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला.


आगामी काळात महाराष्ट्रात देखील असेच काहीसे चित्र-चंद्रशेखर बावनकुळे 


आगामी काळात महायुती सरकारला प्रचंड मोठ्या  प्रमाणात मतदान होईल. इथल्या जनतेला हे माहिती आहे की  राज्याच्या आणि जनतेच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार राज्यात असणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे हरियाणातील सरकारने आम्हाला कौल दिला, जम्मू-काश्मीरमध्ये देखील तसंच पाहायला मिळाले. हेच चित्र आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आज महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते यांनी विजयाचा संकल्प केला आहे. आजच्या या विजयाचा आम्ही सर्वत्र आनंद व्यक्त करत आहोत. या जल्लोषातून आपण परत एकदा महायुतीला विजय करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळेस बोलताना केले आहे. 


हे ही वाचा