चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
Parbhani Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला मदत केली आहे. यानंतर परभणीत काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

परभणी : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेस ऐवजी भाजपला पाठिंबा दिला आहे. चंद्रपूरमधील घडामोडींचा परिणाम परभणीत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परभणी महापालिकेतील महापौर पदाची निवड 12 फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीव परभणीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. परभणी महापालिकेतील ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक सहलीवर गेले आहेत.
परभणीत काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक सहलीवर
परभणीतील महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. परभणीत महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कुठलाही दगाफटका बसू नये म्हणून नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परभणी शहर महानगर पालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक परवा म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वी कुठलाही दगाफटका बसू नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक हे सहलीवर गेले आहेत. परभणी महापालिकेतील एकूण 65 जागांपैकी सर्वाधिक जागा 25 जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सोबत आघाडीत असलेल्या काँग्रेसनं 12 जागा जिंकल्या आहेत.
परभणी महापालिकेत सत्ता या दोन पक्षाचीच असणार आहे. मात्र, भाजपकडून काही नगरसेवकांना संपर्क केला जात असल्याने सत्ता स्थापन करताना कुठलीही अडचण आणि दगा फटका होवू नये म्हणून दोन्ही पक्षांनी आपले नगरसेवक हे सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवसेनेचे 22 नगरसेवक हे सहलीवर गेले आहेत. उर्वरित 3 नगरसेवक आज जाणार आहेत तर काँग्रेसचे 12 नगरसेवकही सहलीवर गेले आहेत. आता दोन्ही पक्षाचे हे सदस्य 12 फेब्रुवारीला थेट निवडीच्या वेळेस सभागृहात पोचणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना या निर्णयाबद्दल अंधारात ठेवल्याची माहिती आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रपूरमधील नगरसेवकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
परभणी महापालिकेतील संख्याबळ: एकूण जागा 65
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 25
काँग्रेस :12
भाजप :12
राष्ट्रवादी काँग्रेस :11
जनसुराज्य शक्ती :3
यशवंत सेना :1
इतर :1




















