Chandrapur Mayor Election 2026: ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे रागाने बैठकीतून निघून गेले, विजय वडेट्टीवार म्हणाले, 'त्यांच्याकडे भाजपची ऑफर, आम्ही 15 मिनिटांत निर्णय घेऊ'
Chandrapur Mayor Election 2026: महापौर पदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी अवघा काही वेळ शिल्लक असताना चंद्रपूरमधील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला.

Chandrapur Mayor Election 2026: राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक (Chandrapur Mayor Election 2026) होत असून, सत्तास्थापनेचा सस्पेन्स टोकाला पोहोचला आहे. 66 सदस्यांच्या या महानगरपालिकेत 34 चा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला मिळालेला नसल्याने भाजप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे. त्यातच भाजपमधील जोरगेवार–मुनगंटीवार वाद आणि काँग्रेसमधील वडेट्टीवार–धानोरकर गटातील संघर्षामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून, सकाळी 11 वाजता महासभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
महापौर पदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी अवघा काही वेळ शिल्लक असताना चंद्रपूरमधील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संदीप गिर्हे हे संतापाच्या भरात बैठकीतून बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
Sandeep Girhe: 'उभाठाशिवाय काँग्रेसचा महापौर बनूच शकत नाही'
बैठकीनंतर संदीप गिर्हे यांनी आक्रमक भूमिका घेत उघड इशारा दिला. “शिवसेना ठाकरे गटाशिवाय काँग्रेसचा महापौर होऊच शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. बैठकीत महापौर पदावर एकमत न झाल्याने ठाकरे गटाची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गट वेळेवर कोणाला समर्थन देणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजपसाठीही महापौर पदाचा मार्ग पूर्णतः बंद झालेला नसल्याचे चित्र आहे.
Vijay Wadettiwar: 'त्यांच्याकडे भाजपची ऑफर, आम्ही 15 मिनिटांत निर्णय घेऊ'
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण विधान करत परिस्थितीवर प्रकाश टाकला. “आमच्याकडे 31 नगरसेवकांचे मतदान आहे. आम्ही शिवसेना ठाकरे गटाला स्थायी समिती अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. उपमहापौर पदाची ऑफरही दिली आहे. मात्र त्यांना महापौर पदच हवे असल्याची भूमिका आहे. त्यावर चर्चा सुरू आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी थेट आरोप केला की, “ठाकरे गटाला भाजपकडून फूस देण्यात आली आहे. भाजपने त्यांना ऑफर दिली आहे. आम्ही येत्या 15 मिनिटांत आमचा अंतिम निर्णय घेऊ.” एकूणच, संदीप गिर्हे यांचा संतप्त पवित्रा, वडेट्टीवारांचे थेट आरोप आणि भाजपची कथित ऑफर यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा थरार शिगेला पोहोचला असून, महापौरपदाची बाजी अखेर कोण मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Chandrapur Election Result 2026: चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल
एकूण जागा 66
काँग्रेस 27
काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना 3
भाजप 23
शिंदेंसेना 1
उबाठा शिवसेना 6
वंचित 2
बसपा 1
अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 2
एमआयएम 1
आणखी वाचा





















