Chandrapur Mayor Election 2026: गेल्या काही दिवसांपासून त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर मंगळवारी नाट्यमय शेवट झाला. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने राजकीय चमत्कार घडवत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली असून, काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Continues below advertisement

Chandrapur Mayor Election 2026: महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर 

चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी 34 चा बहुमताचा आकडा गाठायचा होता. या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला 31 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा 33 वर पोहोचला. एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने निकालावर निर्णायक परिणाम झाला. अवघ्या एका मताने मिळालेल्या विजयामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

या सत्तास्थापनेत उद्धव ठाकरे गटाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपकडून संगीता खांडेकर या महापौरपदाच्या उमेदवार होत्या, तर ठाकरे गटाकडून प्रशांत दानव हे उपमहापौरपदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप आणि ठाकरे गटामध्ये सत्तावाटपाचा ठरलेला फॉर्म्युला महत्त्वाचा ठरला. त्यानुसार महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांसाठी प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेण्यावर एकमत झाले असून, पहिल्या सव्वा वर्षांसाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद ठाकरे गटाला देण्यात येणार आहे.

Continues below advertisement

Chandrapur Mayor Election 2026: वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर

भाजपकडे सुरुवातीला 24 नगरसेवकांचे संख्याबळ होते. यामध्ये भाजपचे 23 आणि शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक होता. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत आला. सहा ठाकरे गटाचे नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ 32 वर पोहोचले. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा 33 वर पोहोचला. तर एमआयएम तटस्थ राहिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 31 वरच अडकले.

या सत्तानाट्यापूर्वी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील, अशी जोरदार चर्चा होती. खासदार संजय राऊत यांनी तर सकाळीच उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करत, “कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता मिळू देणार नाही,” असे विधान केले होते. मात्र काही तासांतच ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा होताच संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

दरम्यान, सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्यात बैठक झाली होती. मात्र या बैठकीत मतभेद उफाळून आल्याने संदीप गिऱ्हे संतप्त होऊन बैठकीतून बाहेर पडले. यानंतर काही वेळातच भाजप नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली आणि सत्तानाट्याला निर्णायक कलाटणी मिळाली. एकूणच, रणनीती, वाटाघाटी आणि अचूक संख्याबळाच्या जोरावर भाजपने चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता काबीज करत मोठा राजकीय चमत्कार घडवला आहे. एका मताने मिळालेल्या विजयाने काँग्रेसला जबर धक्का बसला असून, चंद्रपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Chandrapur Election Result 2026: चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा 66

काँग्रेस 27काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना 3भाजप 23शिंदेंसेना 1उबाठा शिवसेना 6वंचित 2बसपा 1अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 2एमआयएम 1

आणखी वाचा 

ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे रागाने बैठकीतून निघून गेले, विजय वडेट्टीवार म्हणाले, 'त्यांच्याकडे भाजपची ऑफर, आम्ही 15 मिनिटांत निर्णय घेऊ'