Bypoll Election Results 2022: गुजरात आणि हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबत देशात पाच ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक आणि एक लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय. तर काँग्रेसनं हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता मिळवली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पराभवचा सामना करावा लागलाय. पोटनिवडणुकीत भाजपला घवघवीत यश  मिळवण्यात अपयश आले आहे. देशात सहा ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा काय निकाल लागलाय? ते पाहूयात....


विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला दोन जागांवर यश मिळालं आहे तर इतर ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विधानसभा जागावर भाजप उमेदवाराचा विजय झालाय. 


मैनपुरीमध्ये डिंपल यादव विजय -
मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील मैनपुरी लोकसभाची जागा रिक्त होती. येथे झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव यांनी विजय मिळवला आहे. डिंपल यादवचा तब्बल 288461 मतांनी विजय मिळवला. डिंपल यादव यांना 618120 मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपच्या रघुराज सिंह शाक्य यांना 329659 इतकी मते मिळाली आहे. डिंपल यादव यांनी या विजयासह नवीन विक्रम केला आहे. डिंपल यादव मैनपुरी मतदार संघाच्या पहिल्या खासदार झाल्या आहेत. डिंपल यादव यांना 64 टक्केंपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर भाजप उमेदवाराला 34 टक्के मतांवर समाधान मानावे लागलेय. 


उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत काय झालं?
उत्तर प्रदेशमध्ये दोन पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामधील एका जागेवर भाजपच्या उमेदवारानं बाजी मारली आहे तर दुसऱ्या जागेवर राष्ट्रीय लोक दल पार्टीचा उमेदवार निवडून आलाय. खतौली विधानसभा पोटनिवडणुकीत मदन भैया यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. राजकुमारी यांनी 22 हजार मतांच्या फराकनं राजकुमारी यांच्यावर विजय मिळवला आहे. तर रामपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आकाश सक्सेना यांनी समाजवादी पार्टीच्या मोहम्मद आसिम राजा यांचा 34136 मतांनी पराभव केलाय.


बिहारमध्ये भाजपचा विजय -
बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं विजय मिळवला आहे. कुऱ्हानी (Kurhani) विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपनं 3649 मतांच्या फराकनं विजय नोंदवला आहे. भाजपच्या केदार गुप्ता यांनी जनता दलच्या मनोज सिंह यांचा पराभव केला. नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेतल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. 


छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा विजय -
छत्तीसगडमधील भानुप्रतापपुर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं विजय नोंदवलाय. काँग्रेसचे उमेदवार सावित्री मांडवी यांनी भाजपच्या ब्रह्मनंद यांचा 21171 मतांनी पराभव केला. 


ओडिसामध्ये बिजु जनता दल -
ओडिसामधील पदमपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. बिजु जनता दलाचे उमेदवार वर्षा सिंह बरिहा यांनी भाजपच्या प्रदिप पुरोहित यांचा 42679 मतांनी पराभव केलाय. 


राजस्थानमध्ये काँग्रेस -
राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसनं एकमेव विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. सरदारशहरमध्ये काँग्रेसच्या अनिल कुमार शर्मा यांनी भाजपच्या अशोक कुमार यांचा 26852 मतांनी पराभव केला.