मुंबई: देशातील सहा राज्यातील सात विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यामध्ये तेलंगणामधील मुनूगोडे या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 77.55 टक्के मतदान झालं, तर सर्वाधिक कमी म्हणजे 31.74 टक्के मतदान हे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात झालं. 


सहा राज्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडलं. यामध्ये उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ (Gola Gokaran Nath) या ठिकाणी 55.68 टक्के, हरियाणातील आदमपूर (Adampur) येथे 75.25 टक्के, बिहारमधील मोकाममध्ये (Mokama) 53.45  आणि गोपाळगंजमध्ये (Gopalganj) 51.48 टक्के, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व (Andheri East) येथे 31.74, तेलंगाणातील मुनुगोडे (Munugode) येथे 77.55 आणि ओदिशातील धामनगर (Dhamnagar) या ठिकाणी 66.63 टक्के मतदान झालं. 


या सहा जागांवर झालेल्या या निवडणुकांचे निकाल 6 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी या निवडणुका लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जातंय. तसेच बिहारमध्ये नितिश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नव्याने सत्तेत आलेल्या सरकारसाठी  गोपाळगंजची निवडणूक महत्त्वाची आहे. 


मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर त्यांचा विजय पक्का असल्याचं सांगितलं जातंय. पण ठाकरे गटासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून त्यांच्या मागे किती मतदार आहेत हे यातून स्पष्ट होणार आहे.  


काही घटना सोडल्या तर या सर्व सात ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं. उत्तर प्रदेशातील गोळा गोकर्णनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार अरविंद गिरी यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अरविंद गिरी हे तीन वेळा समाजवादी पक्षाचे आमदारही होते. भाजपमध्ये येताना ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते. 


कुलदीप बिश्नोई यांनी हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून राजीनामा दिला होता. काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले, त्यानंतर ही जागा रिक्त झाली. आरजेडीचे अनंत सिंह हे बिहारमधील मोकामा मतदारसंघातून आमदार होते पण एके-47 बाळगल्याच्या आरोपावरून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.  


सुभाष सिंह बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघातून आमदार होते. त्यांना राज्यातील एनडीए सरकारमध्ये मंत्रीही करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके (Ramesh Latke) आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.