Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडाऱ्यात काँग्रेसमध्येचं मोठी बंडाळी बघायला मिळत आहे. भंडारा विधानसभा हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तिकीट नं मिळाल्यानं भंडाऱ्यातील दलित (बौद्ध) बांधवांमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात प्रचंड रोष बघायला मिळत आहे. नाना पटोले यांनी बुद्धिस्ट उमेदवाराला उमेदवारी नाकारत कुणबी समाजातील सून बनलेल्या आणि काँग्रेसची प्राथमिक सदस्यही नसलेल्या महिकेला काँग्रेसनं उमेदवारी दिली. यामुळं बुद्धिस्ट समाजातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाना पटोलेंच्या विरोधात प्रचंड आक्रोश भंडारा जिल्ह्यात बघायला मिळतोय.
दरम्यान, नाना पटोले हे दलित विरोधी असल्याचा घनाघाती आरोप करून या विधानसभेत संपूर्ण बुद्धिस्ट समाज एकत्र येत नाना पटोले यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही देण्यात आला आहे. परिणामी, तिकीटापासून डावललेल्या काँग्रेसच्या प्रेमसागर गणवीर आणि हंसा खोब्रागडे या दोन नेत्यांनी राजीनामा दिलाय.
कोण आहेत राजीनामा देणारे काँग्रेस नेते ?
प्रेमसागर गणवीर हे मागील 35 वर्षांपासून काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळताना काँग्रेस पक्षाला भंडारा जिल्ह्यात मजबूत करण्याचं काम केलं. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत त्यांनी यावेळी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. नाना पटोले यांनी तिकीट नाकारल्यानं स्वतःची कैफियत मांडताना प्रेमसागर गणवीर यांना अश्रू अनावर झाले आहे. तर हंसा खोब्रागडे या दोन वेळेस जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि सभापती राहिलेले आहेत. नाना पटोले यांच्या खंदा समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. दलित समाजातील मोठा चेहरा असून काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सहभाग घेतल्याने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा त्यांनी आता राजीनामा दिलाय.
भंडारा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांचे आवाहन
शरद पवार साहेबांनी आज राजकीय निष्ठेला सर्वाधिक महत्त्व असल्याचे म्हटले आहे. अशात सर्वच प्रमुख पक्ष फिरून आलेल्या आणि राजकीय निष्ठेशी कुठलाही संबंध नसलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांना स्वतः त्यांनी पक्ष प्रवेश आणि तिकीट कसे काय दिले? असा सवाल भंडारा जिल्ह्यातील पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी विचारला आहे.
किरण अतकरी म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्र समिती असे कितीतरी पक्ष फिरून आलेले आमदार चरण वाघमारे यांची राजकीय भूमिका कधीच स्थिर नसते आणि निष्ठा सतत बदलत असते. हे आता पर्यंत कित्येक वेळा सिद्ध झाले आहे. आता त्याच चरण वाघमारे यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. कितीतरी पक्ष बदलून आलेले आणि प्रत्येक वेळी आपल्या पक्षाशी विसंगत भूमिका घेणारे चरण वाघमारे म्हणतात की मला शरद पवार साहेबांनी स्वतः आग्रह करून पक्षात घेतले आणि तिकीट दिले आहे. या मागे सत्य काय आणि असे करण्यामागे काय कारण होते, असा प्रश्न आता भंडारा जिल्ह्यातील राशप आणि काँग्रेस कार्यकर्तेच विचारत आहेत.
आणखी वाचा
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी