BMC Elections 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिंदे आघाडीनं काठावरचं बहुमत मिळवलं.मात्र, मुंबईत मराठीबहुल भागात ठाकरे बंधूनी जोरदार मुसंडी मारली. दुसरीकडे, धारावी सुद्धा ठाकरेंच्या मदतीला आली. धारावीत सात पैकी फक्त एकच जागा महायुतीला मिळाली, तर चार जागांवर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने विजय मिळवला आणि दोन जागा काँग्रेसकडे गेल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे घर गमावण्याची भीती, स्थलांतराची चिंता आणि भवितव्याबाबतची अनिश्चितता या सगळ्या भीतींचा परिणाम थेट मतदानावर दिसून आला. “आपल्याला वाचवायला कोण उभं आहे?” हा प्रश्न विचारत मतदारांनी ठाकरेंच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. मुंबईत शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानी साम्राज्य मुंबईत कसं वाढत गेलं याचा लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं होतं. शिवतीर्थावरील त्या एकमेव सभेनं वातावरण बदलल्याची चर्चा होती.
धारावीमधील वॉर्डनिहाय चित्र
- वॉर्ड 185 मध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे टी. एम. जगदीश यांनी भाजपचे रवी राजा यांचा 2, 000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. रवी राजा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते होते. ते सायन–कोळीवाड्यातून लढत होते, पण धारावी त्यांच्या मूळ मतदारसंघात नव्हता. उलट जगदीश हे याच वॉर्डचे माजी नगरसेवक असल्याने मतदारांमध्ये त्यांची पकड मजबूत होती.
- वॉर्ड 186 मध्ये अर्चना शिंदे (शिवसेना उद्धव गट) यांनी नीला सोनावणे (भाजप) यांचा पराभव केला. अर्चना शिंदेंना 6,731 तर सोनावणेंना 5,690 मते मिळाली.
- वॉर्ड 187 मध्ये जोसेफ कोळी (शिवसेना उद्धव गट) विजयी झाले. त्यांना 7,067 मते मिळाली. काँग्रेसच्या आयशा खान 5,753 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
- वॉर्ड 189 मध्ये हर्षला मोरे (शिवसेना उद्धव गट) यांनी भाजपच्या मंगला गायकवाड यांचा तब्बल 4,479 मतांनी पराभव केला. हर्षला मोरे यांना 8,081 मते मिळाली.
- या दोन्ही वॉर्डमध्ये (185 आणि 189) मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे निकाल थोडा उशिरा जाहीर झाला, पण अखेरीस विजय कायम राहिला.
काँग्रेसची पकड कायम
धारावीत काँग्रेसनेही आपली दोन जागा राखून ठेवल्या. वॉर्ड 183 मध्ये आशा काळे यांनी शिवसेनेच्या वैशाली शेवाळे यांचा 1,254 मतांनी पराभव केला. वॉर्ड 184 मध्ये साजिदा बब्बू खान यांनी वर्षा नाकाशे यांचा 2,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
महायुतीला फक्त एकमेव जागा
महायुतीला धारावीत एकमेव जागा वॉर्ड 188 मध्ये मिळाली. शिंदे गटाचे भास्कर शेट्टी यांनी केवळ 460 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
इतर महत्वाच्या बातम्या