Continues below advertisement

मुंबई : महापालिका मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना अनेक ठिकाणी पैशाच्या वाटपावरुन वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय. ताडदेव परिसरात (Tardeo) भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक महिलांनी विरोध केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पळ काढल्याचं दिसून आलं. प्रदीप छेडा, प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप असून ते मंत्री मंगल प्रभात लोढांचे जवळचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

Mumbai Tardeo Rada : महिलांच्या विरोधानंतर पळ काढला

ताडदेवमधील वॉर्ड क्रमांक 215 मध्ये पैसे मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची घटना घडली. लाडकी बही‍ण योजनेच्या नावाखाली भाजपचे प्रदीप छेडा, प्रकाश मोरे यांनी हे पैसे वाटप केल्याचा आरोप आहे. मात्र, इमारतीमधील महिलांनी उलट प्रश्न केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी पळ काढल्याचं दिसून आलं.

Continues below advertisement

प्रदीप छेडा हा मंगल प्रभात लोढांचा जवळचे सहकारी मानला जातो. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप झाल्यानंतर त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी ताडदेवमधील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं आहे.

ताडदेवमधील वॉर्ड क्र 215 ठाकरेंच्या शिवसेनेकडून किरण बाळसराफ तर भाजपकडून संतोष ढाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या भावना कोळी यांना रिंगणात उतरवलं आहे.

BMC Election : ताडदेवमध्ये कोण बाजी मारणार?

ताडदेव वॉर्ड क्रमांक 215 मध्ये ताडदेव, चिखलवाडी, भाटिया हॉस्पिटल, तुळशीवाडी या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. यंदा हा वॉर्ड अनुसुचित जातींसाठी राखीव करण्यात आला आहे. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या अरुंधती दुधवडकर विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या श्वेता मांजरेकर, काँग्रेसच्या ललिता माहिदा आणि मनसेच्या सरोज बाबर यांचा पराभव केला होता. 2017 मध्ये निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पण यंदा मात्र राजकीय समीकरणं बदलली आहेत.

आताच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार आहे. मराठी पट्टा असलेल्या ताडदेवमध्ये ठाकरेंनी त्यांची ताकद पणाला लावल्याचं दिसतंय. त्यामुळे या प्रभागामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी वाचा: