BMC Election Result 2026: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकांत महायुतीला अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत (BMC) भाजपने (BJP) तब्बल 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Faction) 29 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, या निकालानंतर राज्याच्या राजकारणात नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. “आमचे नगरसेवक सुरक्षितपणे आपापल्या घरी आहेत. मात्र, शिंदे यांनी स्वतःच्या आणि भाजपच्या नगरसेवकांना कैदखान्यात का डांबून ठेवले आहे?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, “एकनाथ शिंदे आता भाजपचेच नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही पाहायला मिळत आहे,” असेही त्यांनी सांगितले. आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले की, निवडणूक काळात सर्वांनी जीवाचे रान केले म्हणून त्यांना एकत्र केले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) कोणतेही नगरसेवक फुटणार नाहीत. उलट ठाकरेंचे नगरसेवक फुटण्याची शक्यता आहे. फोडाफोडीचे राजकारण त्यांनी करू नये. मुंबई महापालिका त्यांच्या हातून गेली. मातोश्री 2 चे मेंटेनन्स कोण करणार? ही चिंता त्यांना आहे. भाजप शिवसेना युती घट्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Prakash Mahajan on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावाला धोका दिला
संजय राऊत यांची आजारपणामुळे बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीकाही महाजन यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, युतीमध्ये महापालिका निवडणुका लढल्या आहेत. आपापसात मतभेद निर्माण करण्यासाठी काही बातम्या पसरवल्या जात आहे. फडणवीस आणि शिंदे हे दोघे मिळून निर्णय घेतील. जो निर्णय घेतील ते दोघांच्या हिताचे असतील. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावाला धोका दिला, त्यांच्या 65 आल्या आणि त्यांचे 6 कसे येतात हे पहिले त्यांनी बघावे. मिडिया ठाकरेंच्या बाजूला होता. पण, तरीही ठाकरेंना बहुमत मिळालेले नाही. महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचा राजकीय वारस म्हणून जाहीर केले आहे. आम्ही युतीत लढलेलो आहोत, यांच्यासारखे 2019 मध्ये सोबत लढले आणि निवडणुका झाल्यानंतर बाजूला गेले, असे आम्ही करत नाही, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, असे देखील प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
