मुंबई : यूपी, बिहारचं राजकारण... जिथे निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमात महिला नाचवल्या जातात, भोजपुरी गाण्यावर त्या थिरकतात, अश्लील हातवारे करतात आणि समोरचे लोक त्याचा विकृत आनंद घेतात. मतदारांना खुश करण्याचा हा फंडा यूपी, बिहार, झारखंड यासारख्या मागास उत्तर भारतीय राज्यांमध्ये हमखास अवलंबला जातो. पण तोच फंडा आता महाराष्ट्रात, मुंबईतही वापरला जात असल्याचं दिसून आलं. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर महिला नाचवल्या गेल्या... आणि विशेष म्हणजे, भाजपच्या मंत्र्यांनी त्या कृत्याचं समर्थन केल्याचं दिसून आलं.
या आधी महाराष्ट्राचा यूपी, बिहार झालाय असा अनेकदा आरोप केला जायचा, पण आता लोकांनी तो 'याची देही याची डोळा' पाहिला. मुंबईतील भाजपच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टेजवर चक्क महिलेला नाचवलं गेलं. त्यावरुन टीका होत असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र आपल्या स्थानिक नेत्याचं समर्थन केल्ं.
Mumbai BJP Woman Dance Video : नेमकं काय घडलं?
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मध्ये भाजपच्या उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचारासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन भाजपचे नेते, सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि नावाआधी आचार्य असं लिहिणाऱ्या पवन त्रिपाठी (Acharya Pawan Tripathi) यांनी केलं होतं. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्याच स्टेजवर काळ्या साडीतील एक महिला 'लैला मैं लैला' या गाण्यावर थिरकत होती.
या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी या कार्यक्रमाचा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली. मुंबईमध्ये भाजपकडून महिलांना नाचवून प्रचारसभेला गर्दी जमवण्यात येत असल्याचा आरोप अखिल चित्रेंनी केला. महापुरूषांच्या पुतळ्यासमोर महिलांना नाचवून भाजप महापुरूषांचा अपमान करत आहे अशी टीका करत 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा' असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Chandrashekhar Bawankule : आमच्या महिलांचा आनंद... बावनकुळेंकडून समर्थन
पवन त्रिपाठीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमावरुन सर्व स्तरातून टीका होत असताना भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र त्याचं समर्थन केल्याचं दिसून आलं. 'लोकांनी आनंद व्यक्त केला. आमच्या प्रचार आणि प्रसारामध्ये, आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला तर एवढं बोलायची गरज काय आहे? शेवटी हा महिलांचा आनंद आहे' अशा शब्दात बावनकुळेंनी याचं समर्थन केल्याचं दिसून आलं.
यूपी, बिहारसारख्या उत्तरेतील मागास राज्यांमध्ये महिलांना नाचवणे ही गोष्ट नवीन नाही. निवडणुकीच्या कार्यक्रमात प्रत्येक पक्षाकडून अशा नाचगाण्याची सोय करण्यात येते, त्याशिवाय मतदारही खुश होत नाहीत. पण महाराष्ट्रासाठी मात्र हे नवीन आहे. मुंबईत हिंदी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी कदाचित, हिंदी भाषिक असलेल्या पवन त्रिपाठीने हा फंडा अवलंबला असेल. पण त्यातून महाराष्ट्राची संस्कृती मात्र लयास जात असल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा: