BMC Election 2026 मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वांद्रे परिसरात ठाकरेंचे निष्ठावंत कट्टर शिवसैनिक चंद्रशेखर वायंगणकर (Chandrashekhar Waingankar) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने प्रभाग क्रमांक 95 मध्ये (BMC Ward 95) चंद्रशेखर वायंगणकर यांना डावलून हरी शास्त्री (Hari Shastri vs Chandrashekhar Waingankar) यांना तिकीट दिलं आहे. त्यावरुन वायंगणकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी हरी शास्त्री यांच्यासाठी ताकद लावली, तर वायंगणकर यांच्यासाठी अनिल परब (Anil Parab) आग्रही होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं तिकीट हरी शास्त्री यांना दिल्याने, वायंगणकर टोकाचे नाराज झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन, मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध मोठं आव्हान उभं केलं आहे. वायंगणकरांनी एबीपी माझाशी बोलताना मनातील सल जाहीर केली.
पक्ष संकटात असताना ऑफर आल्या पण आम्ही पैशांपेक्षा निष्ठा स्वीकारली आणि या निष्ठेचे फळ आम्हाला हे मिळालं. मला उमेदवारी का दिली नाही हा प्रश्न मला आहे. श्रीकांत सरमळकर यांच्या जावयाला तिकीट दिले. तुम्ही परप्रांतीयाला तिकीट देता आणि महापौर मराठी होणार म्हणता? कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही आणि ही जागा निवडून आणून, पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार, असं चंद्रशेखर वायंगणकर म्हणाले.
चंद्रशेखर वांगणकर यांना तिकीट नाकारून हरी शास्त्रींना उमेदवारी (Hari Shastri vs Chandrashekhar Waingankar)
प्रभाग क्रमांक 95 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर यांना तिकीट नाकारून हरी शास्त्री यांना तिकीट दिलं.त्यामुळे चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष अर्ज भरला आणि आपण कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही, उलट ही सीट निवडणूक लढवून जिंकून येऊन शिवसेनेत जाणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याच जागेवरून वरून सरदेसाई आणि अनिल परब यांच्यात उमेदवारी देण्यावरून मतभेद पाहायला मिळाले.
आम्हाला प्रश्न पडलाय की मला उमेदवारी शिवसेनेकडून का मिळाली नाही? पक्ष अडचणीत असताना उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केले. आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई यांना उमेदवारी अशी बातमी तुम्ही दाखवत आहे. श्रीकांत सरमळकर यांना आमदार कोणी केलं? आम्ही त्यांच्यासाठी फिरलो होतो. आमच्यासारखे असंख्य शिवसैनिक होते त्याच्यामुळे ते आमदार झाले.
परप्रांतीयाला तिकीट, मग मराठी महापौर कसा?
सरमळकर यांचा जावई आला कुठून?? सर्वसामान्य शिवसैनिकांनी करायचं काय? मराठी माणसाला तुम्ही तिकीट डावलून तुम्ही परप्रांतीयला देणार आणि म्हणणार महापौर मराठी होणार? माझी लढाई हरी शास्त्रींच्या विरोधात नाही, माझी लढाई भाजपच्या विरोधात आहे. आम्ही ही सीट जिंकून आणू आणि मग पुन्हा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत जाणार, असंही वायंगणकर म्हणाले.
शिवसेनेच्या शाखा माझ्यासोबत आहेत, शिवसैनिक माझ्यासोबत आहेत मी कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही. बंडखोरी तुम्ही का म्हणताय? मी शिंदे गटात गेलो का? आम्हाला पक्ष फुटला तेव्हा ऑफर होती. आम्ही पैशाला महत्व दिलं नाही. निष्ठेला महत्त्व दिलं आणि जर निष्ठेला हे फळ मिळत असेल तर मग काय बोलायचं? असे घणाघाती सवाल वायंगणकरांनी उपस्थित केले.
शिवबंधन सोडलं नाही
मी शिवसेना सोडली नाही, मी अपक्ष अर्ज भरला. पण मी शिवबंधन अजूनही सोडलं नाही मी कुठेही जाणार नाही. माझा जन्म शिवसैनिकाच्या पोटी झाला आहे.माझे वडील उपशाखाप्रमुख होते. माझे वडील आमदार खासदार नव्हते, अशी आठवण वायंगणकरांनी करुन दिली.
30-35 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करतोय. 1992-93 च्या दंगलीत सुद्धा मी होतो. शिवसेनेचे कुठलेही आंदोलन तुम्ही बघा, मी त्या आंदोलनात आहे. अनिल परब यांनी आमची समजूत घातली. आम्हाला वाटलं होतं, पाच वाजेपर्यंत एबी फॉर्म देतील पण आम्हाला दिला नाही. मला फाजील आत्मविश्वास नाही. शिवसैनिकांनी घेतलेला हा निर्णय आहे. असे अनेक नगरसेवक आहेत ज्यांना चौथ्यांदा, पाचव्यांदा तिकीट दिलं आहे. मग मला दुसऱ्यांदा तिकीट का दिलं नाही? असा सवाल वायंगणकर यांनी विचारला.
VIDEO : निवडून येऊन मातोश्रीवरच जाऊ, चंद्रशेखर वायंगणकर यांनी रणशिंग फुंकलं
संबंधित बातम्या
