मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमधील निवडणुकीचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. कोणत्या वॉर्डात कोणत्या पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत याबाबत स्पष्टता निर्माण झाली आहे. हे चित्र स्पष्ट होताच ठाकरे बंधूंच्या युतीनं अर्थात शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MNS) या दोन्ही पक्षांकडून मुंबई महानगरपालिकेसाठी मिनी जाहीरनामा अर्थात ठाकरे बंधूंना ( Thackeray brothers) मुंबई करावयाच्या १६ मुद्द्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे या १६ मुद्द्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं, त्यामध्येही काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या होत्या. ठाकरे बंधूंच्या युतीच्या २२७ उमेदवारांसमोर त्यांनी हे प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर आज मुंबईसाठी ठाकरे बंधूंचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिध्द करणार असल्याची माहिती आहे.
आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात जाणार आहेत. ठाकरे बंधू यंदा महानगरपालिका (BMC Election 2026) निवडणुकीत सहा प्रचारसभा घेणार आहेत. तर दुसरीकडे आजपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेदेखील प्रचार करणार आहेत. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात वीजबिल, बेस्ट बस दर, पाळणाघर, शासकीय महाविद्यालयाबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray and Uddhav Thackeray: 12 गेमचेंजर घोषणा कोणत्या?
त्याचबरोबर 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याबाबत, 100 युनिटपर्यंत वीज मोफत करु, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये महिन्याला देऊ, कोळी महिलांना माँसाहेब किचनमधून 10 रुपयांत जेवण मिळेल, तरुणांना रोजगार सहायता निधीतून मदत देणार, बेस्टचं तिकीट कमी करुन 5 ते 10 रुपये, 15 ते 20 रुपये यादरम्यान स्थिर ठेवणार, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर असेल, पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरु केले जाईल, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मोठं ग्रंथालय सुरु करण्यात येईल, प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारणार, मुंबई पालिकेतर्फे मोफत पार्किंगची सोय करणार, बीपीटीच्या 1800 जागेवर गिफ्ट सिटीसारखं काम केलं जाईल, हे महत्त्वाचे मुद्दे देखील जाहीरनाम्यात असणार आहेत.
BMC Election: कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
-नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी – २३ ते ३० डिसेंबर-नामनिर्देशन पत्र छाननी – ३१ डिसेंबर २०२५-उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – २ जानेवारी २०२६-निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६-मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडेल.-निवडणूक निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागेल.
