BMC Election 2026: आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेचा आवाज बनलो, येणाऱ्या काळात पण आम्ही तेच काम करणार आहोत, अशी सूचक प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुंबई मनपासाठी काँग्रेस आणि ठाकरेंची आघाडी झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांची आघाडी झाली नसल्याने महायुतीला फायदा झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. किमान 41 ठिकाणी भाजप शिंदे महायुतीला काँग्रेस आणि ठाकरे एकत्र नसल्याने फायदा झाला आहे. विशेष म्हणजे भाजप शिंदेंना काठावरचं बहुमत मिळाल्यानं महापौरपदावरून चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे.
नगरसेवकांची तुलना खऱ्या सोन्याशी
दरम्यान, वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सोन्यामध्ये पण 17 कॅरेट असतं 22 कॅरेट असतं आमचं तर 24 कॅरेट म्हणजे खरं सोन आहे आणि खरं सोनं बदलत नाही. त्या म्हणाल्या की, आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं तुम्ही ऐकलं का की त्यांना आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं किंवा कुठला दबाव आहे? आज सगळे स्वेच्छेने आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. त्या म्हणाल्या की, जनतेतून ते निवडून आले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आले आहेत. ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला हा खरंच त्यांचा खूप मोठा विजय आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना पूर्ण या गोष्टीची जाणीव आहे की पक्ष त्यांच्या मागे उभा आहे. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी त्यांच्या मागे उभे आहेत.
भाई जगतापांकडून राजीनाम्याच्या मागणी, काय म्हणाल्या?
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना आपला पक्ष मजबूत कसा होईल हे ध्येय धोरण असणार आहे. ज्यांना टीका करायची ते टीका करू शकतात कारण आमच्याकडे लोकशाही आहे आणि भाजपमध्ये हुकुमशाही आहे. आमच्याकडे पक्ष जो आहे तिथे आपली मत मांडण्याचे प्रत्येक नेत्याला अधिकार आहे. काही लोक मांडतात, पक्ष त्यावरती निर्णय घेत असतो. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण काम करत आहोत. पक्षाने जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्या म्हणाल्या की, मी अध्यक्ष पदासाठी मागणी केली नव्हती, पक्षाने मला अध्यक्ष केलं आहे आणि पक्षाने मला ताकद दिली आहे. जसं माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या सहकाऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये संघटना मजबूत करण्यावरती आमचा भर राहील, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या