BMC Election 2026 Mahayuti Manifesto: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर महायुतीकडून वचननामा (Mahayuti Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आला. दोन लाख नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन हा वचननामा तयार करण्यात आला आहे. या वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई करणे, 20 ते 35 लाख घरांची निर्मिती करणे, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ तयार करणे, पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती, धारावीचा विकास हा डीआरपी करणार, 350 स्के. फूटपर्यंत आम्ही धारावीतच घरे देणार, अशा बड्या घोषणा मुंबईकरांसाठी करण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा वचननामा जाहीर करत आहोत. मुंबई महापालिका निवडणुक 15 तारखेला पार पडत आहे. मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवेल असं वचन आम्ही देत आहोत. 16 तारखेला महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल. मुंबईच्या विकासासाठी जे करायचं आहे ते आम्ही मांडत आहोत. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमच काम आहे. मुंबईकर कल्याण-डोंबिवली अंबरनाथपर्यंत गेला याला जबाबदार कोण? याचा विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले.
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: मुंबई पागडीमुक्त करणार
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुंबई पागडीमुक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला. जिथ ओसी मिळत नव्हती, त्यामुळे पाणीपट्टी दुप्पट येत होती ते देखील बंद केले. झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांच स्वप्न होतं ते देखील आम्ही पूर्ण करणार आहोत. रमाबाई आंबेडकर नगर एसआरए आणि एमएमआरडी करत आहे. 20 वर्षापासून त्यांना भाडे मिळत नव्हते त्याची देखील सोय आम्ही केली आहे. 150 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गिरणी कामगारांना आम्ही घरे दिली आहेत.
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: लाडक्या बहिणीसाठी बेस्ट भाडे 50 टक्के करणार
20 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. पंतप्रधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर सातत्याने टीका करत आहेत की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार परंतु असं कदापी होणार नाही. आम्ही लाखो तरुणांना रोजगार देणारे लोक आहोत. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आम्ही महापालिकेची मदत घेऊन साजरे करणार आहोत. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ करणार आहोत. लाडक्या बहिणीसाठी बेस्ट भाडे 50 टक्के करणार आहोत. लघू उद्योजकांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहोत. पुनर्विकासाठी कोणतेही अडथळे येणार नाहीत याची व्यवस्था केली आहे. पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीचा वचननामा जाहीर केला आहे. इतर कुणीही वचननामा दिला तरीही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा असेल. पुढील पाच वर्षानंतर आम्ही काय-काय केलं याचा एक रिपोर्ट जनतेसमोर आम्ही मांडू. काही ठिकाणी उंचीची अडचण निर्माण होत आहे. याच्यावर काम करत आहोत. रडार सिस्टीम ठिकाण बदलता येईल का? यासाठी प्रयत्न करत आहोत. मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. काही लोक बोलत राहिले आम्ही मात्र करून दाखवलं. बीडीडी, अभ्युदय नगर, विशाल सह्याद्री नगर याचे उदाहरण आहे.
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: 350 स्के. फूटपर्यंत आम्ही धारावीतच घरे देणार
आधी विकासक लोकांना 20-20 वर्ष घरे देत नव्हते. परंतु आता पुनर्विकास म्हाडा करणार आहे. देखरेखीसाठी आम्ही विकासक देऊ. त्याने कामात काही कमी जास्त केलं तर त्याचे सगळे अधिकार हे म्हाडाला जातील. धारावीचा विकास हा डीआरपी करणार आहे. 350 स्के. फूटपर्यंत आम्ही धारावीतच घरे देणार आहोत. महानगर पालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठी आम्ही घरे देणार आहोत. 2019 मध्येच हे होणार होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलला होता. आता मात्र आम्ही त्यांना हक्काचे घर देणार आहोत. महापालिका शाळा कौशल्ययुक्त करणार आहोत. मराठी लँगवेज लॅब तयार करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: वचननाम्यातील काही महत्त्वाच्या घोषणा
- मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
- पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये
- बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
- सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
- फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
- लघु उद्योग धोरण राबवले जाणार
- पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
- बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
- बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
- बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार
- स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
- लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
- पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
- मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
- बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
- पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
- हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
- रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार
- विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार
आणखी वाचा
