मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पहिल्या उमेदवारी यादीत 30 ते 40 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपकडून (BJP) आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाऊ शकते, असा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जागावाटप बराचकाळ रखडले होते. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीचे उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी फारसा अवधी मिळाला नव्हता. याचा फटका महायुतीला बसला होता. हाच अनुभव लक्षात घेता आता भाजपकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच 30 ते 40 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप आपल्या उमेदवारांची घोषणा करु शकते. त्यामुळे भाजपच्या या पहिल्या उमेदवारी यादीत कोणाचा समावेश लागणार, याविषयी आतापासून तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 30 ते 40 जागांची घोषणा लवकरच होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यातील बहुतांश जागा त्या असतील जिथं गेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता, किंवा खूप कमी फरकानं विजय झाला होता. तसंच, आरक्षित जागांचा देखील समावेश असणार आहे. डिसेंबर 2023मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये देखील असाच प्रयोग भाजपनं केला होता, ज्याचा बराच फायदा झाला होता. त्यामुळे आता भाजपने महाराष्ट्रातही हीच रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भाजपला किती फायदा होणार, हे येणारा काळच ठरवेल.
राज ठाकरेंच्या मनसेचे विधानसभेचे तीन उमेदवार ठरले
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात राज ठाकरे यांच्या मनसेने आघाडी घेतली आहे. मनसेने आतापर्यंत तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे आणि लातूर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे सरचिटणीस असलेल्या संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आणखी वाचा