Mumbai Election 2026 मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचा (Election) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मुंबई महापालिकेकडे (Mumbai Municipal Corporation Election 2026) अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, एकीकडे ठाकरे बंधू प्रत्यक्ष मैदानात उतरून जोरदार प्रचार आणि सभांचं नियोजन करताना दिसतायत. तर दुसरीकडे महायुती, महाविकास आघाडी आणि इतर प्रमुख पक्षही मोर्चे बांधणी करत असल्याचे चित्र आहे. त्यात आता पक्षाची धुरा संभाळणारे कार्यकर्तेही आता जोमाने कामाला लागले आहे. दरम्यान मुंबईच्या गोरेगाव (Goregaon) पश्चिमेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोरेगाव पश्चिमेच्या प्रभाग नंबर 58 मध्ये भाजप (BJP) आणि मनसेमध्ये (MNS) तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. गोरेगाव पश्चिमेत अमृत नगर भागात प्रचाराचे टेबल लावण्यावरून भाजप आणि मनसेमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)
BJP vs MNS Conflict : भाजप आणि मनसेमध्ये तुफान राडा, हाणामारीमध्ये मनसेच्या एक कार्यकर्ता जखमी
दरम्यान, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले आहे. या हाणामारीमध्ये मनसेच्या एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे. तर घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र या राड्यामुळे गोरेगाव परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्यासोबत किती जण दोन्ही बाजूने जखमी आहेत, या संदर्भात गोरेगाव पोलीस तपास करत आहे. तर गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.
BMC Election 2026 : ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर पार पडणार
दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळतोय. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर, म्हणजेच शिवाजी पार्कवर पार पडतेय. सध्या मैदानावरची तयारी पूर्ण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या स्टेजवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, तो स्टेज पूर्णपणे सज्ज आहे. या स्टेजवर ठाकरे बंधूंचा मोठा फलक लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र ठेवण्यात आलं आहे, जे या सभेचं प्रतीकात्मक महत्त्व अधिक अधोरेखित करतंय.
यासोबतच, सभास्थळी एलईडी स्क्रीन्सही लावण्यात आल्या आहेत. ‘लाव रे तो व्हिडिओ’मधून नेमकं काय दाखवलं जाणार, ठाकरे बंधू काय संदेश देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईच्या राजकारणात आणि विशेषतः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा किती महत्त्वाची ठरते, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
संबंधित बातमी: