Bhiwandi Nizampur Mahangarpalika Election 2026: भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नारपोली भंडारी चौक (Narpoli Chowk Bhiwandi) या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 येथील भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूकडून लाठ्या काठ्या व दगडांचा मारा केल्याने दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या हाणामारीच्या घटनेनंतर नारपोली व भोईवाडा पोलिस ठाण्यातील मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल होत त्यांनी सौम्य लाठीचार्ज करून परिसरातील गर्दी पांगवली असून या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होतेतर दोन्ही बाजूकडून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
BJP vs Congress : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर घोषणा देताच भाजपच्या केडरचा संताप
भंडारी चौक नारपोली येथील वॉर्ड क्रमांक 20 येथे भाजपा उमेदवार यशवंत टावरे व काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय रस्त्याला लागून आहे. काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय मनोज म्हात्रे यांच्या पत्नी वैशाली म्हात्रे , जितेंद्र पाल हे काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गल्लीतून जात होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यातच कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. सायंकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून भाजपा कार्यालयाच्या समोरुन जात घोषणाबाजी केली. ज्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाल्यानंतर दोन्हीकडून प्लॅस्टिक खुर्च्या लाठ्या काठ्या व दगड भिरकावण्यात आले. विशेष म्हणजे रॅलीत सुद्धा पोलीसही उपस्थित होते. त्यांच्यादेखत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी केला आहे.
Bhiwandi Election 2026: भाजपा कार्यकर्त्यांनी महिलांवर दगडफेक करीत हल्ला चढवला
आम्ही काँग्रेस उमेदवाराची रॅली काढून डोअर टू डोअर प्रचार करत असताना त्यांनी आम्हाला त्या विभागात जाण्यापासून रोखले.त्यानंतर महिलांवर भाजपा कार्यकर्त्यांनी दगडफेक करीत हल्ला चढवला. 2017 मध्ये माझ्या वडिलांची हत्या केली होती . आता माझ्या उमेदवार असलेल्या आईवर हल्ला चढवला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यालयावर खुर्च्या दगड फेकून मारली असा आरोप काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांची मुलगी हर्षाली म्हात्रे यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या