मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून प्रचार जोरात सुरू आहे. त्यासाठी, सर्वच पक्षाचे बडे नेते मैदानात उतरले असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेल्या टीकेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) हे शहरात आले होते. त्यावेळी, त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचं नाव घेऊन वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, आपल्या वडिलांवर केलेल्या या टीकेला आता दिवंगत विलासराव देशमुख यांच्या तिन्ही मुलांनी (Amit deshmukh) उत्तर दिलंय. अभिनेता रितेशने व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केला. दरम्यान, त्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारणाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमित देशमुख यांनी दिली. तसेच, विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान, लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून, हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे, अशा शब्दात अमित देशमुख यांनी भाजपवर पलटवार केला.
अभिनेता रितेश देशमुख यानेही रवींद्र चव्हाणांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. व्हिडिओ शेअर करत रितेश देशमुख म्हणाला की, "दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र." त्यानं मोजक्या शब्दांत सणसणीत उत्तर दिलं. रितेश देशमुखनं हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर, आता धीरज देशमुख यांनीही ट्विटवरुन मोजक्याच शब्दात उत्तर दिलंय.
साहेब, तुम्ही आहात... इथेच आहात... आमच्यातच आहात...सदैव आहात, असे म्हणत धीरज यांनी वडिलांच्या फोटोसमवेतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
सत्तेचा माज, हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूर शी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा!"
अखेर, रविंद्र चव्हाणांकडून दिलगिरी
"लातुरमध्ये मी जे काही म्हटलं, मी विलासरावांवर जराही, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्या टिकाटिप्पणी केलेली नाही. विलासराव खूप मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. लातुरात विलासरावांवरच फोकस ठेवून काँग्रेस तिथे मतदान मागतंय, त्यामुळे त्याठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात झालेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक दृष्टीकोनातून झाल्यात. यासंदर्भात मी तसं म्हटलं, पण तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव, जे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो... तुम्ही राजकीयदृष्ट्या याकडे पाहू नका, एवढं मी त्यांच्या चिरंजीवांना सांगेन..."