Maharashtra Goverment मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहे. दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजता ही बैठक होईल. अमित शाहांच्या भेटीसाठी अजित पवार सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस दुपारी साडेतीन वाजता दिल्लीकडे निघणार आहेत. तर एकनाथ शिंदे दुपारी 4 वाजता दिल्लीला रवाना होतील. या भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता आहे. याचदरम्यान नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होत तरुण चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.
दिल्लीतील बैठकीत आज मुख्यमंत्रिपदाबाबत निश्चिती झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या नावांवर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे आज सकाळपासून सागर बंगल्यावर आमदारांची रिघ पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देखील महायुतीमधील अनेक आमदार सागर बंगल्यावर दाखल झाले होते. अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात युवा आमदारांना जास्त संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी आतापासून तयारी केली जाणार आहे. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांचा धाकधूक वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे-
विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमित शाह, नरेंद्र मोदींच्या निर्णयाला आमच्या पक्षाचा पाठिंबा- एकनाथ शिंदे
अमित शाह, नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इथे उभा आहे, एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले. कुठही घोडं अडलेलं नाही. मी कुठेही काही अडून धरलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असा ऐताहासिक विजय असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.