Ashish Deshmukh मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंय. यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेंच सुरु आहे. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे गेल्या लोकसभेच्या वेळी राज्यासह विशेषत: विदर्भात मोठी मुसंडी मारलेल्या मविआ अन् काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशातच यावरुन भाजपचे आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काँग्रेसवर तोफ डागत घणाघाती टीका केली आहे.
काँग्रेस नेत्यांचा उद्धटपणा लोकांनी दाखवुन दिला- आशिष देशमुख
काँग्रेसची आज बैठक आहे, मात्र काँग्रेसमध्ये काहीही राहिलेलं नाही. राज्यात फक्त पाच टक्के काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपात काँग्रेस विलिन करावा आणि देश हिताच्या कामासाठी त्यांनी हातभार लावावा, असा सल्ला देत भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी हे सर्व नेते भांडत होते. तर काँग्रेस नेत्यांचा उद्धटपणा लोकांनी दाखवुन दिला. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केल पाहिजे, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी यावेळी केली.
25 वर्षानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त करत भाजपचा विजयी झेंडा
सावनेर विधानसभा मतदारसंघात (Saoner Vidhan Sabha Election) यंदा भाजपने बाजी मारली. तर पाच टर्म प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी तथा काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे आशिष देशमुखयांनी त्यांचा 26, 401 मतांनी पराभव केला. निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 18 पैकी दोन वगळता अन्य उमेदवारांना अत्यल्प मतांवर समाधान मानावे लागले आहे.
एकूण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मतदारांनी आशिष देशमुख यांच्या झोळीत 1 लाख 19 हजार 725 मते टाकली, तर अनुजा केदार यांना 93,324 मते मिळाली. देशमुख आणि केदार यांच्यात सरळ लढत झाली. मतमोजणीत देशमुख यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम होती. एका फेरीत केदार यांनी आघाडी घेतली होती. परिणामी या ठिकाणी भाजपचे डॉ. आशिष देशमुख यांनी केदार यांचा बालेकिल्ला उध्वस्त करत भाजपाचा विजयी झेंडा रोवला आहे.
हे ही वाचा