Lok Sabha Elections:  आगामी काळातील लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) भाजपकडून (BJP) तयारी सुरु करण्यात आली आहे. संघाकडून मिळालेल्या सल्ल्यांनंतर राजकीय समिकरणांबरोबरच जातीय समिकरणे सुधारण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान पक्ष नेतृत्वाकडून एक मोठा निर्णय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व मंत्री आणि खासदरांना तयार राहण्याच्या सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्याना भाजपकजडून निवडणूक लढवण्याची संधी मिळते, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 


माहितीनुसार, भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडून राज्यसभेतील जे खासदार केंद्रात मंत्रीपद भूषवतात त्यांना लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी सार्वत्रिक लोकसभेच्या जागांसाठी मतदारसंघ निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना देखील या सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोण निवडणुकांच्या रिंगणात उतरणार याची देखील सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. 


'हे' मंत्री 'या' मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची शक्यता


1. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तमिळनाडूमधून निवडणुकांच्या रिंगणात उतरु शकतात. 


2. परराष्ट्रमंत्री डॉ सुब्रह्मण्यम जयशंकर हे देखील तमिळनाडू मतदारसंघाची निवड करु शकतात. 


3. वाणिज्य आणि उद्याोग मंत्री पीयूष गोयल हे महाराष्ट्रातून निवडणुकांच्या मैदानात उतरु शकतात. 
 
4. केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे - महाराष्ट्र


5. केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल - आसाम


6.  केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया - मध्य प्रदेश 


7.  केंद्रीय  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव - ओडिशा


8.  केंद्रीय  पेट्रोलियम,गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी - पंजाब किंवा जम्मू काश्मीर 


9. केंद्रीय  आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया - गुजरात


10.  केंद्रीय  पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव - हरियाणा किंवा राजस्थान


11. केंद्रीय मत्स्य उत्पादन आणि पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला  - गुजरात


कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवायची किंवा निवडणूक लढवायची की, नाही याचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून घेण्यात येईल, असं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोणते मंत्री लोकसभेची निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून अनेक रणनिती सध्या आखल्या जात आहेत, त्यातीलच ही एक असल्याचा पक्षाकडून सांगण्यात येत आहे. आता पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे सर्व मंत्री आणि खासदाराचं लक्ष लागून राहिल्याचं सांगण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Modi : 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : मोदी