नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात सीटिंग गेटिंग फॉर्म्युलाचे पालन केले जाईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्याचवेळी वेळ पडल्यास पक्षासाठी त्याग करण्याची आपली तयारी असल्याचेही बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी स्पष्ट केले. मी या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही उमेदवारी मागणारही नाही. 15 वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवणार होतो. मात्र, तेव्हा पक्षाने सांगितले की पक्षाचे काम करा. आताही पक्ष अध्यक्ष म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय करेल, मला माहिती नाही. मात्र, कामठी विधानसभा मतदारसंघात (Kamthi Vidhan Sabha) कोणत्याही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी बजावेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते गुरुवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत भाजपच्या सीटिंग आमदार बद्दल तसेच ज्या जागांमध्ये आम्ही strong आहोत, मात्र फार कमी मतांनी पराभूत झालो होतो, अशा जागांबद्दल चर्चा होईल. काही उमेदवारांची नावे अंतिम होतील. त्यानंतर टप्याटप्प्याने पुढील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. मात्र, आजच्या बैठकीत सर्व नावांवर चर्चा होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या जागांबाबत बावनकुळे काय म्हणाले?
सध्या शिंदे गटाकडील आमदारांच्या मतदारसंघाबद्दल आम्ही चर्चा करत नाही. अजितदादांकडे असलेल्या आमदारांच्या मतदारसंघबद्दलही आम्ही चर्चा करत नाही. मात्र, तिन्ही पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघांना वगळून उरलेल्या मतदारसंघावर तिन्ही पक्ष चाचपणी केली जात आहे. जो त्यामध्ये पुढे दिसेल त्या पक्षाला त्या मतदारसंघात उमेदवारी मिळेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
तसेच जागावाटपासाठी सीटिंग गेटिंग हे सूत्र जवळपास निश्चित आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल होऊ शकते..(खासकरून अजितदादा यांच्यासोबत) अजित पवारांचा पक्ष अनेक ठिकाणी आमच्या विरोधात 2019 मध्ये लढला होता. अनेक मतदारसंघ जिथे दोन्ही पक्ष (भाजप आणि राष्ट्रवादी) तुल्यबळ आहे, तिथे जो पक्ष मजबूत असेल, त्याप्रमाणे काही जागांची अदलाबदल होऊ शकते. याशिवाय, भाजपच्या आमदारांबद्दल अँटी- इन्कम्बन्सी असेल तर ते बदलले जाऊ शकतात का?? त्याबद्दल केंद्रीय भाजप सर्वेक्षण केलेलं आहे, ते निर्णय करतील.. मात्र, काही आमदारांबद्दल इन्कम्बन्सी असेल, तर सीट तर आम्हाला गमवायची नाही, म्हणून केंद्रीय निवडणूक समिती त्याबद्दल निर्णय करू शकते, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
त्यागाला फुटपट्टी नसते, पण एकनाथ शिंदेंनी मन मोठं करायला हवं: चंद्रशेखर बावनकुळे
अमित शहा एकनाथ शिंदे सोबत काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र, हे खरं आहे की मुख्यमंत्रीपद अत्यंत महत्त्वाचं असतं, सरकार मुख्यमंत्रीच्या नावाने चालतं. सध्याच्या सरकारला एकनाथ शिंदे सरकार असंच म्हटलं जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आमचाही आग्रह असतो, आमचे एवढे आमदार आहे, आम्हालाही पक्ष आणि संघटना सांभाळायची असते, त्यामुळे पद, महामंडळ, समित्या आमच्या संख्याबळानुसार आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी आमची नेहमीच मागणी असते. मात्र, अमित शहा एकनाथ शिंदेंना काय म्हणाले हे मला माहीत नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे मोठं मन करून आमच्याकडे आले, त्यामुळे एकनाथ शिंदेंचा ही त्याग आहे आणि आमच्याही त्याग आहे. कोणाचा किती त्याग याला काही फुटपट्टी लावता येत नाही. एकनाथ शिंदे यांनी मोठे मन करुन आणि आम्हीही समजूतदारपणे युतीपुढे नेली पाहिजे, असे बावनकुळे यांनी म्हटले.
जास्त जागा लढवून कमी जागा जिंकण्यात काही अर्थ नाही: बावनकुळे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांना असे वाटते की त्यांनी जागा लढल्या पाहिजेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा स्टेटस राहिला पाहिजे. काही माणसं त्यांच्याशी जोडलेली आहेत. त्यांना असं वाटते की त्यांच्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. मात्र, जिथे शिंदेंच्या पक्षाची शक्ती आहे, त्याच जागा त्यांनी लढल्या पाहिजे. जिथे आमची शक्ती आहे ती जागा आम्ही लढल्या पाहिजे. निवडणूक लढवायची आणि पराभूत व्हायचं हे आम्हाला आणि त्यांना कोणालाही परवडणार नाही. महायुतीने जिंकण्यासाठी लढलं पाहिजे. संख्या वाढवण्यासाठी कोणीही मतदारसंघ घेऊ नये ना आम्ही न शिंदेंनी. 180 जागा घ्यायची आणि 50 जिंकायचे त्याला अर्थ काय आहे, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.
बंडखोरांना बावनकुळेंचा इशारा
मल्लिकार्जुन रेड्डी यांना दोन वर्षापासून सूचना दिली होती की, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी महायुतीचा सरकार आणण्याकरता महत्त्वाच्या भूमिकेत होते. नंतर त्यांनी शिवसेनेकडे जाणं पसंत केले. ते पूर्वीचे शिवसैनिकच आहेत. एकदा महायुतीने निर्णय घेतला मग बंड पुकारणं हे सहन केलं जाणार नाही. जिथे आमचा उमेदवार किंवा आमदार असेल त्याच्या विरोधात बंड होईल तेही सहन केले जाणार नाही. पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोलणं वेगळं मात्र सार्वजनिकरित्या पक्षाच्या भूमिकेवर नेतृत्वावर टीका करणे, बंडखोर ची भूमिका करणे, हे सहन केले जाणार नाही हे सहन केले जाणार नाही. फक्त भाजपच नाही तर महायुतीमध्येही अशाच पद्धतीने महायुतीचा वातावरण खराब करण्याचा कोणी प्रयत्न केले, तर तिन्ही पक्ष ते सहन करणार नाही, कारवाई करतील, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांना दिला.
आणखी वाचा